प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, असं म्हटलं जातं. कारण- एखादा पुरुष यशाचं शिखर गाठतो तेव्हा त्याच्या पाठीशी त्याची पत्नी खंबीरपणे उभी असते. या यशाच्या श्रेयात तिचाही मोलाचा वाटा आसतो. जेव्हा हे श्रेय पती सर्वांसमोर पत्नीला देतो तेव्हा तिची मान अभिमानानं आणखी जास्त उंचावते. आता असंच काहीसं ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेमध्ये सध्या चांदेकर आणि खरे अशा दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याचं कारण म्हणजे अद्वैतला ‘बिझनेसमॅन ऑफ द इयर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या नवऱ्याला इतका मोठा पुरस्कार मिळणार असल्यानं त्याची पत्नी कला हिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मालिकेत आतापर्यंत पुरस्कार जाहीर झाल्याचं समजलं आहे. त्यामुळे आता पुढे हा पुरस्कार स्वीकारताना अद्वैत याचं श्रेय त्याची आई सरोज चांदेकरला देणार की पत्नी कला खरेला देणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत.

अशात नुकताच या मालिकेच्या पुढील भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, पुरस्कार सोहळ्याला विविध व्यावसायिक आणि प्रतिष्ठित व्यक्ती जमलेल्या आहेत. त्यामध्ये खरे आणि चांदेकर कुटुंबीयही आले आहेत. येथे आल्यावर अद्वैतला हा पुरस्कार दिला जातो. त्याला पुरस्कार स्वीकारताना पाहून कला आणि सरोज दोघींच्या डोळ्यांत आनंद दिसतो.

पुढे पुरस्कार स्वीकारल्यावर अद्वैत त्याचं मनोगत व्यक्त करतो. मनोगत व्यक्त करताना तो यशाचं श्रेय आपल्याला देईल, असं सरोजला वाटू लागतं. मात्र, अद्वैत यावेळी थेट कलाचं नाव घेताना दिसतो आहे. मत व्यक्त करताना तो म्हणतो, “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असं म्हणतात. माझ्या आयुष्यातील ती स्त्री म्हणजे कला खरे-चांदेकर. माझी बायको.” त्यानंतर अद्वैत कलाला मंचावर येण्याची विनंती करतो.

अद्वैतनं यशाचं श्रेय देताना आईऐवजी कलाचं नाव घेतल्यानं सरोज आता काहीशी नाराज झाली आहे. आपल्या मुलाला कला तिच्या जाळ्यात ओढत आहे, असं तिला वाटत असल्याचं व्हिडीओमधून समजत आहे. मालिकेत अद्वैत आणि कला यांच्यामध्ये सतत वाद झाल्याचे पाहायला मिळते. लहान मुलं एकमेकांशी विविध मुद्द्यांवरून जशी भांडतात, त्याप्रमाणेच ही दोघंही एकमेकांशी भांडतात.

अद्वैत कलाशी सतत भांडत असला तरी वेळ आल्यावर तो नेहमीच कलाच्या बाजूनं उभा राहतो आणि तिला साथ देतो. आताही त्यानं त्याच्या यशाचं श्रेय देताना तिचं नाव घेतल्याचं पुढील भागात पाहता येणार आहे. मालिकेचा हा सीन पुढील भागात म्हणजे उद्या रविवारी (१६ फेब्रुवारी) दुपारी १ आणि संध्याकाळी ६ वाजता पाहता येईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshmichya pavalani serial new promo video advaita attribute his success to wife kala rsj