मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी आपल्या अभिनय क्षेत्रातील कामासह स्वतःचा व्यवसाय करत आहेत. २०२४मध्ये अनेक कलाकारांनी व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं. अभिनेत्री मृणाल दुसानिस, अनुष्का पिंपुटकर, मेघन जाधव, सई ताम्हणकर, रेश्मा शिंदे, अक्षया देवधर, अपूर्वा गोरे, तेजस्विनी पंडित, प्रसाद लिमिये, महेश जाधव अशा अनेक कलाकारांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं. आता या यादीमध्ये आणखी एका अभिनेत्याचं नाव सामिल झालं आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्याने स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलं आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सध्याच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. अभिनेत्री ईशा केसकर, अक्षर कोठारी, किशोरी अंबिये, दिपाली पानसरे, मंजुषा गोडसे, मिलिंद ओक असे तगडे कलाकार मंडळी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत पाहायला मिळत आहेत. मालिकेत ईशाने साकारलेली कला आणि अक्षरने साकारलेला अद्वैत प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. कला-अद्वैतची जोडी घराघरात पोहोचली आहे. इतर कलाकारांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता ऋत्विक तळवलकर.
अभिनेता ऋत्विक तळवलकरने ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत सोहम चांदेकरची भूमिका साकारली आहे. याच सोहम म्हणजे ऋत्विकने नवीन वर्षांच्या मुहूर्तावर स्वतः;चं रेस्टॉरंट सुरू करून व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. यासंदर्भात त्याने व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओत ऋत्विक तळवलकर म्हणाला, “हॅलो…नमस्कार मंडळी…आज मी हा व्हिडीओ अत्यंत आनंदाची बातमी देण्यासाठी बनवतं आहे. तर काही दिवसांआधी मी सर्वांना सांगितलं होतं की, मी ऑनलाइन रेस्टॉरंट म्हणजेच क्लाउट किचन सुरू करतोय. ‘द मिसळ कॅटीन’ असं त्याचं नाव आहे. २९ डिसेंबरपासून वसंत विहार, ठाण्यामध्ये माझं क्लाउट किचन सुरू झालं आहे. तुम्ही झोमॅटोद्वारे ऑडर करू शकता. तसंच वसंत विहारमध्ये राहत असाल तर घरपोच डिलिव्हरी होऊ शकते. या कॅटीनमध्ये मिसळसह असंख्य मराठी पदार्थ तुम्हाला मिळतील. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की आस्वाद घ्या.”
हेही वाचा – Video: सलमान खानचा ५९वा वाढदिवस जामनगरमध्ये जल्लोषात साजरा, अंबानींनी आयोजित केलेली खास पार्टी, पाहा व्हिडीओ
ऋत्विक तळवलकरचा हा व्हिडीओ अनेक कलाकारांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. अभिनेत्री साक्षी गांधी, ध्रुव दातार, ऋतुजा कुलकर्णी, देविका मांजरेकर अशा अनेक कलाकारांसह चाहत्यांनी ऋत्विकला त्याच्या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.