हिंदी टेलिव्हिजनवरील सध्याचा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो म्हणजे ‘लाफ्टर शेफ.’ ज्याप्रमाणे ‘लाफ्टर शेफ’च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला, तसंच आता दुसऱ्या सीझनवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. ‘लाफ्टर शेफ’च्या दुसऱ्या सीझनमध्ये काही कलाकार बदलले असले तरी नव्या कलाकारांनी अल्पावधीतचं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘लाफ्टर शेफ’च्या पहिल्या सीझनपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे सुदेश लहरी यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. ही आनंदाची बातमी सुदेश लहरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

लोकप्रिय कॉमेडियन सुदेश लहरी यांनी आपल्या विनोदी शैलीने हिंदी टेलिव्हिजन आणि सिनेविश्वात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतेच सुदेश लहरी आजोबा झाले. त्यांनी आपल्या घरी नव्या पाहुण्याचं स्वागत केलं. सुदेश यांचा मुलगा मणिला मुलगा झाला आहे. चिमुकल्या नातवाबरोबरचा सुदेश यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये चिमुकल्या नातवाने आजोबा सुदेश यांचं बोट हातात पडकल्याचं पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत सुदेश यांनी लिहिलं, “आमचा घरचा नवा पाहुणा… #नातू.”

नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे लहरी कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरलं आहे. इतर कलाकार मंडळी सुदेश लहरी यांना शुभेच्छा देत आहेत. भारती सिंह, सोनू निगम, कश्मीरा शाह, अदिती भाटिया अशा अनेक कलाकारांनी सुदेश यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. कृष्णा अभिषेकने इन्स्टाग्राम स्टोरीवर आजोबा सुदेश लहरींसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. सुदेश आणि त्यांच्या नातवाचा फोटो शेअर करत कृष्णा अभिषेकने लिहिलं आहे, “आतातरी वय झालं मान्य करा,” कृष्णाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

कृष्णा अभिषेकची इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, सुदेश लहरी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर २००७ मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामुळे सुदेश यांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर ‘कॉमेडी सर्कस’मधून ते घराघरात पोहोचले. या कार्यक्रमात सुदेश यांनी कृष्णा अभिषेकसारख्या कॉमेडियनबरोबर परफॉर्मन्स केला. मग ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’मध्ये ते पाहायला मिळाले. विनोदी कार्यक्रमांव्यतिरिक्त त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘रेडी’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘टोटल धमाल’, ‘जय हो’, ‘तारा मिरा’, ‘ड्रिम गर्ल २’, ‘बॉस’ अशा अनेक चित्रपटांत सुदेश लहरी झळकले आहेत.