Sudesh Lehri Reveal Grandson Face: लोकप्रिय कॉमेडियन सुदेश लहरी यांनी आपल्या विनोदी शैलीने हिंदी टेलिव्हिजन आणि सिनेविश्वात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या ते ‘कलर्स टीव्ही’ वाहिनीवरील ‘लाफ्टर शेफ्स २’मधून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहेत. ‘लाफ्टर शेफ्स’च्या पहिल्या सीझनपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे सुदेश लहरी काही दिवसांपूर्वी आजोबा झाले. त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. याच चिमुकल्या पाहुण्याचा चेहरा सुदेश लहरींनी नुकताच सगळ्यांसमोर आणला आहे. त्यांनी पहिलाच नातवाबरोबरचा रील व्हिडीओ शेअर केला आहे.
सुदेश लहरी ( Sudesh Lehri ) २८ मार्चला आजोबा झाले. त्यांचा मुलगा मणिला मुलगा झाला. ही आनंदाची बातमी सुदेश यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली होती. यावेळी कृष्णा अभिषेक शुभेच्छा देत म्हणाला होता की, आतातरी वय झालं मान्य करा…अभिनंदन आजोबा. त्यानंतर आता सुदेश लहरी यांनी नातवाबरोबरचा पहिला रील व्हिडीओ शेअर करून त्याचा चेहरा दाखवला आहे. तसंच नावाचादेखील खुलासा केला आहे.
“मेरा नाम रोशन करेगा इवान लहरी”, असं कॅप्शन लिहित सुदेश लहरींनी ( Sudesh Lehri ) नातवाबरोबर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेते नातू इवानबरोबर खेळताना दिसत आहेत. सुदेश यांच्या नातवाचा हा रील व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. इवान हे गणपतीचं नाव असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या सुदेश यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून प्रत्येकजण इवान लहरीला आशीर्वाद देताना पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, सुदेश लहरी ( Sudesh Lehri ) यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर २००७ मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामुळे सुदेश यांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर ‘कॉमेडी सर्कस’मधून ते घराघरात पोहोचले. या कार्यक्रमात सुदेश यांनी कृष्णा अभिषेकसारख्या कॉमेडियनबरोबर परफॉर्मन्स केला. मग ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’मध्ये ते पाहायला मिळाले. विनोदी कार्यक्रमांव्यतिरिक्त त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘रेडी’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘टोटल धमाल’, ‘जय हो’, ‘तारा मिरा’, ‘ड्रिम गर्ल २’, ‘बॉस’ अशा अनेक चित्रपटांत सुदेश लहरी झळकले आहेत.