मालिकेतील एखादे नाते प्रेक्षकांना भुरळ घालते. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील रेवती आणि लीलाचे नातेदेखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसते. त्यांच्यातील प्रेम, काळजी प्रेक्षकांना भावते. आता रेवतीसाठी लीला एजेविरुद्ध उभी राहणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे .
बहिणीसाठी लीलाने दिले एजेला चॅलेंज
झी मराठी वाहिनीने ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, एजे घरातील सर्वांना म्हणतो, “आपण श्वेता आणि यशच्या एंगेजमेंटची तयारी करायला पाहिजे.” त्याच्या या बोलण्यावर सरस्वती आणि लक्ष्मी खूश होताना दिसतात. मात्र, लीलाला तिच्या मावशीआईने बोललेले शब्द आठवतात. तिने लीलाला स्पष्ट शब्दांत सांगितलेले असते की, यश आणि श्वेताचा साखरपुडा थांबवायलाच हवा. त्यावर लीलाने तिला हो म्हणून आश्वस्त केलेले असते. ती एजेला म्हणते, “ते ठीक आहे. मी बघतेच तुम्ही यश आणि श्वेताची एंगेजमेंट कशी करताय?” लीलाचे हे बोलले ऐकून एजे, “इनफ, ही एंगेजमेंट होणार आहे”, असे म्हणतो. लीला म्हणते, “मी तुम्हाला चॅलेंज देते. काहीही झालं तरी यश आणि रेवूचं नातं तोडू शकणार नाही.”
झी मराठीने हा प्रोमो शेअर करताना, ‘यश आणि रेवतीमुळे एजे आणि लीलाच्या नात्यात दुरावा येणार का?’, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, रेवती आणि यश एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच ही गोष्ट त्यांनी रेवतीच्या घरी सगळ्यांना सांगितली होती; मात्र दुसरीकडे एजेने यशचे लग्न श्वेताबरोबर ठरवले आहे. लीलाचे रेवतीवर खूप प्रेम आहे. ती तिच्या बहिणीसाठी काहीही करू शकते. यशला त्याचे रेवतीवर प्रेम आहे, हे एजेला सांगण्याची हिंमत होत नाही. आता यश आणि रेवतीमुळे लीला आणि एजे एकमेकांसमोर उभे राहिले आहेत.
हेही वाचा: Video: शत्रूच्या ‘त्या’ कृतीने सर्वांच्या भुवया उंचावल्या; म्हणाला, “तेजूच्या नावापुढं…”
आता मालिकेत पुढे काय होणार, यश आणि रेवतीला त्यांचे प्रेम वाचवता येणार का की यशला श्वेताबरोबर लग्न करावे लागणार, या सगळ्यात लीला आणि एजेच्या नात्यावर त्याचा परिणाम काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.