सध्या ‘शार्क टँक इंडिया’ या शोच्या दुसऱ्या सीझनची चांगलीच चर्चा आहे. लवकरच हा दूसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच्या पहिल्या सीझनला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. शिवाय या दुसऱ्या सीझनमध्ये अशनीर ग्रोवर नसल्यामुळेसुद्धा हा शो बराच चर्चेत आहे. अशनीरच्या जागी अमित जैन शार्क म्हणून जबाबदारी निभावणार आहेत. चाहत्यांप्रमाणे परीक्षक अर्थात शार्क्ससुद्धा चांगलेच उत्सुक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच या शोमधील शार्क पीयूष बन्सल यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. सर्वप्रथम या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी व्हायचं का नाही याबाबत पियुष यांची द्विधा मनस्थिती होती. पहिल्या सीझनमुळे त्यांना मिळालेली प्रसिद्धी आणि त्यामुळे रोजचं आयुष्य जगताना येणाऱ्या अडचणी यामुळे त्यांनी या नवीन सीझनमध्ये न यायचं ठरवलं होतं, पण नंतर त्यांनी तो निर्णय बदलला.

आणखी वाचा : “पुरुष सहकलाकारच…” तमन्ना भाटीया आणि भूमी पेडणेकरने सांगितला इंटीमेट सीन करतानाचा अनुभव

पियुष याबद्दल म्हणाले, “या शोमुळे जे फॅन फॉलोइंग मिळालं आहे त्यामुळेच मी याचा नव्या सीझनमध्ये न येण्याचा विचार करत होतो. एवढ्या ग्लॅमरची मला सवय नाही आणि गरजही नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलाला जो आत्ता केवळ अडीच वर्षांचा आहे आम्हाला एक साधं आयुष्य हवं आहे. पण जेव्हा मी या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या स्पर्धकांच्या डोळ्यातील चुणूक पाहिली तेव्हा मी या दुसऱ्या सीझनमध्ये पुन्हा यायचं निश्चित केलं.”

या कार्यक्रमामुळे पियुष यांना एवढी प्रसिद्धी मिळाली कि ठीकठिकाणी त्यांचे चाहते त्यांना ओळखू लागले. याविषयी बोलताना पियुष म्हणाले, “नुकतंच मी तब्बल ३० ते ४० दिवसांनी मॉलमध्ये गेलो तेव्हा लोकांनी लगेच मला ओळखायला सुरुवात केली. जेव्हा मी एयरपोर्टवर होतो आणि माझा चेहरा मी मास्क आणि जॅकेटने पूर्ण झाकायचा प्रयत्न केला होता तरी एका मुलीने केवळ मला माझ्या आवजावरून ओळखलं. हे खरंच खूप छान आहे, पण मला याची सवय नाही.” पियुष हे ‘लेन्सकार्ट’चे सीइओ आहेत. २ जानेवारीपासून शार्क टँक इंडियाचा हा दूसरा सीझन सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lenskart ceo peyush bansal was not willing to be part of shark tank india season 2 avn