चित्रपट व मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांप्रमाणेच संबंधित कलाकृती लिहिणारी लेखिका किंवा लेखक सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. पडद्यामागून ते मोठी भूमिका बजावत असतात. मधुगंधा कुलकर्णी ही उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्तम लेखिका म्हणून देखील ओळखली जाते. सध्या ती ‘नाच गं घुमा’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीने एका मुलाखतीत मालिका व चित्रपट लेखनामधील फरक स्पष्ट केला आहे.
मधुगंधा कुलकर्णीने आजवर अनेक मालिकांचं लेखन केलं आहे. याशिवाय ‘वाळवी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि. व चि. सौ का’ अशा अनेक चित्रपटांचं लेखन देखील तिने केलं आहे. आता लवकरच मधुगंधाचा ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा : Video : ‘कन्यादान’ फेम अमृता बनेचं सासरी ‘असं’ झालं स्वागत! सूनबाई अन् लेकासाठी सासऱ्यांनी केली खास तयारी
मधुगंधाला यावेळी ‘तारांगण’च्या मुलाखतीत चित्रपट व मालिकांच्या लेखनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. अभिनेत्री म्हणाली, “चित्रपट लेखनात अर्थात जास्त आनंद मिळतो कारण, आपल्याला जे म्हणायचं ते स्पष्टपणे सांगता येतं. पण, टीव्हीवरच्या लेखनात काय अपेक्षित आहे हे आपल्या हातात नसतं. एका विशिष्ट पद्धतीत मालिकांचं लेखन करावं लागतं. त्या कंटेटशी तुम्ही दरवेळी लेखक आणि माणूस म्हणून सहमत असता असं नाहीये.”
“याउलट चित्रपटांमध्ये आपल्याला जे सांगायचंय ते लगेच मांडता येतं. पण, चित्रपट हा बेभरवशाचा धंदा आहे. मालिकांमध्ये दर महिन्याला तुम्हाला एका मोठा चेक येतो घरी…याचा आनंद आहे.” असं मधुगंधा कुलकर्णीने सांगितलं.
हेही वाचा : ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराजची ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, येणार ७ वर्षांचा लीप
दरम्यान, मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांचा ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.