अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर(Madhurani Prabhulkar) ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचली. या मालिकेतून तिला मोठी लोकप्रियता मिळाली. पाच वर्षे ‘आई कुठे काय करते’मधून अभिनेत्री अरुंधती या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता मधुराणी प्रभुलकर तिच्या भूमिकेमुळे नाही तर तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने या मालिकेआधी तिला इतकी मोठी संधी का मिळाली नाही, तो काळ तिच्यासाठी कसा होता? यावर भाष्य केले आहे.
लोकांना वाटत असेल…
मधुराणी प्रभुलकरने नुकतीच मित्र म्हणे या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत तुला ‘आई कुठे काय करते’ आधी का चांगली संधी मिळाली नाही? अशा आशयाचा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्रीने म्हटले, “योग हे एक कारण आहे. कामाच्या बाबतीतल्या निवडी याला कारणीभूत असाव्यात. कारण मी अनेक वर्षे जाहिरातीत काम करत असल्याने त्यावेळी लोकांना वाटत असेल की ही बहुतेक फक्त जाहिरातीत काम करते, मालिकेत काम करणार नाही. याची आर्थिक गणितं फार वेगळी असतात. त्यावेळेला मला जो पर डे मिळाला असता, जे मी महिन्याभरात कमावले असते, ते मला एका जाहिरातीत मिळायचे.
तू दहावीतच ठरवलं होतं की तुला अभिनेत्री व्हायचं आहे. दिसायला सुंदर, साहित्यिक जाण, वाचनाची आवड, भाषा चांगली असतानासुद्धा काम मिळत नव्हतं, तेव्हा तू काय विचार करत होतीस? या प्रश्नाचे उत्तर देताना मधुराणी प्रभुलकरने म्हटले, “सहाजिकच मला वाईट वाटायचं, दु:ख वाटायचं. पण मी म्हटलं तसं की, आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही, ही माझी निवड होती. मी अभिनेत्री होताना मी काय बघत मोठी झाले? तर मी पुण्यातील प्रायोगिक रंगभूमी, तिथे येणारी चांगली नाटकं बघत मोठी झाले. त्याचा माझ्यावरती प्रभाव होता. जेव्हा टेलिव्हिजन सुरू झालं तेव्हा ‘शांती’, ‘सैलाब’, ‘बनेगी बात अपनी’ अशा स्त्रीच्या प्रगतशील भूमिका असणाऱ्या मालिका बघितल्याने मी तिकडे आकर्षित झाले. मला हे करायचं आहे असं ठरवलं. मला असं वाटतं की, जेव्हा टेलिव्हिजन आलं तेव्हा लोकांना असं वाटलं असणार की, समाजातील एक विशिष्ट वर्गच ज्यांना परवडतो तो टेलिव्हिजन बघेल. पण, जेव्हा टेलिव्हिजन सर्वत्र पसरला तेव्हा तळागाळापासून सगळ्यांना काय आवडले; सहन करणारी, त्याग करणारी, सोशिक, स्त्रीने स्वत:ला दुय्यम स्थान दिलेलं नेहमीच समाजाला आवडतं. समाज अशा स्त्रीला पुजतो, तर अशा स्त्रियांच्या भूमिका दाखवल्या जाऊ लागल्या, त्यामुळे मी काही मालिका स्वत: नाकारल्या.”
जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला कलाकार व्हायचं आहे, पण आपण काही निवडक भूमिका साकारत असतो. आपल्याला हवी तशी कामं मिळत नाहीत. एका अर्थानं आपण मुख्य प्रवाहातून गायब असतो. तो काळ तुझ्यासाठी कसा होता. यावर अभिनेत्रीने म्हटले, “तो काळ म्हणजे सहन करता येणार नाही, एवढी गुदमर होती. काम तर करायचं होतं, तसं काम बनत होतं, पण जिथे मला हवं तसं काम बनत होतं, तिथे मी पोहोचू शकत नव्हते. त्यानंतर मी मुलीसाठी काही वर्षांसाठी पुण्यात येऊन स्थायिक झाले. पुणे-मुंबई जवळ असलं, अडीच-तीन तासात येत असलं तरी ती दोन वेगळीच शहरं आहेत. तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला मुंबईतच असायला लागतं, हे खरं आहे. आता आपण काहीतरी करायला पाहिजे, आपल्याकडे जे कलागुण आहेत, ज्ञान आहे, त्याचं काहीतरी केलं पाहिजे. नुसता अभ्यास, चिंतन-मनन, निरीक्षण करून उपयोग नाही. कुठेतरी संधी मिळणं गरजेचं आहे. कारण ते करून बघितल्याशिवाय तुम्हाला अभिनय येतो की नाही, हे तुम्हाला कसं कळणार; त्यामुळे प्रचंड प्रमाणातली घुसमट होती, त्रासदायक घुसमट होती.”