अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर(Madhurani Prabhulkar)ने ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिच्या अरुंधती या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाल्याचे पाहायला मिळते. आता मात्र मधुराणी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मधुराणीने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती समुद्रातून प्रवास करीत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर तिने एका किल्ल्याला भेट दिल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये किल्ल्यावरील तोफा, मंदिर, विहीर, किल्ल्यावरून दिसणारा समुद्र पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हा कुलाबा किल्ला असल्याचे कळते.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने कुलाबा किल्ल्याला भेट दिल्यानंतर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत अभिनेत्रीने लिहिले, “अलिबागला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. तेव्हा तिथल्या किनाऱ्यावरच्या ‘कुलाबा किल्ल्याला’ भेट दिली आणि अक्षरशः भारावून गेले. तिथे किती काय काय आहे. दगडी भक्कम तटबंदी, त्या काळातल्या तोफा, उजव्या सोंडेच्या गणपतीचं मंदिर, भवानीमाता मंदिर, समुद्रात बांधलेल्या या किल्ल्याच्या मधोमध असणारी गोड्या पाण्याची विहीर. या किल्ल्याबद्दल मला अजून माहिती हवी होती; पण ती देऊ शकणारा गाईडसुद्धा तिथे नव्हता याची खंत वाटली. आपल्या महाराष्ट्रात किती अप्रतिम महत्त्वाची ऐतिहासिक पर्यटनस्थळं आहेत; पण त्याकडे का कुणी गांभीर्याने बघत नाहीये?” पुढे अभिनेत्रीने या किल्ल्याविषयी गूगलवर मिळालेली माहिती दिली आहे.
अभिनेत्रीची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी कमेंट्स करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने, ‘आनंद घे व सुरक्षित राहा’, असे म्हटले आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती”, असे म्हटले आहे. आणखी एका नेटकऱ्याने, “आम्ही अलिबागकर असल्याचा अभिमान आहे”, असे लिहिले आहे.
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’मध्ये मधुराणीने अरुधंतीचे पात्र साकारले होते. तिने साकारलेल्या पात्राचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीला अगदीच सोशीक असणारी अरुंधती वेळप्रसंगी लढा देत असल्याचे या मालिकेत पाहायला मिळाले. पुढे ती स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करते, मोठमोठे निर्णय घेते, अशी अरुंधतीची भूमिका पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असते. विशेषत: तिने सादर केलेल्या कविता प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळते. आता आई कुठे काय करते या मालिकेनंतर मधुराणी कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.