Actress Madhuri Dixit At Star Pravah Awards : ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला ‘पंचक’ सिनेमा थिएटरनंतर आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने यंदा पार पडलेल्या ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याला माधुरी दीक्षितने उपस्थिती लावली होती. माधुरी मखमली साडी आणि गळ्यात मोत्याचा नेकलेस घालून सुंदर अशा इंडो-वेस्टर्न लूकमध्ये या सोहळ्याला उपस्थित राहिली होती. तिच्या एन्ट्रीने सगळेच भारावून गेल्याचं पाहायला मिळालं.
‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कारांचं यंदा पाचवं वर्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून अवघा महाराष्ट्र या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. आपल्या अभिनय आणि नृत्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी धकधक गर्ल ‘स्टार प्रवाह’ परिवार पुरस्कारांच्या रेड कार्पेटवर अवतरली आणि आपल्या अदाकारीने तिने सर्वांची मनं जिंकून घेतली.
कोण असेल ‘तो’ लकी सदस्य?
माधुरी आणि तिचं नृत्यावरील प्रेम सर्वश्रूत आहेच. तिच्याकडून नृत्याचे धडे घेणं म्हणजे पर्वणीच. साक्षात माधुरीसमोर नृत्यकला सादर करण्याची संधी ‘स्टार प्रवाह’च्या कलाकारांना मिळाली. ‘स्टार प्रवाह’ परिवारातल्या एका लकी सदस्याला माधुरीकडून एक खास भेटवस्तू मिळणार आहे. हा लकी सदस्य कोण? आणि या लकी सदस्याला नेमकं काय मिळणार? हे आपल्याला १६ मार्च रोजी प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या ‘स्टार प्रवाह पुरस्कार’ सोहळ्यात पाहता येणार आहे.
माधुरी दीक्षितला माध्यमांशी संवाद साधताना “छोट्या पडद्यावर म्हणजेच मालिकांमध्ये काम करायला आवडेल का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर धकधक गर्ल म्हणाली, “मोठा आणि छोटा पडदा असं काही नसतं. मनोरंजन हे सगळ्या माध्यमातून होतं. मी तर, ओटीटीवर सुद्धा काम केलंय. मला करिअरमध्ये नेहमीच नवनवीन संधी मिळाल्या त्यामुळे यासाठी रोज मी देवाचे आभार मानते. त्यामुळे कोणत्याही माध्यमांवर काम करण्यास मी तयार आहे. सध्या मराठीमधल्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर माझा ‘पंचक’ सिनेमा टेलिव्हिजनवर रिलीज होतोय त्यावर माझं सगळं लक्ष आहे.”

तसेच “मराठी मालिकांची निर्मिती करायला आवडेल का?” यावर “हो जरूर का नाही आवडणार, मी नक्की निर्मिती करेन.” असं उत्तर माधुरीने दिलं आहे.