Madhuri Dixit : बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षितने नुकतीच ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. माधुरीची निर्मिती असलेला ‘पंचक’ सिनेमा थिएटरनंतर आता येत्या १३ एप्रिलला ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रदर्शित केला जाणार आहे. याच निमित्ताने अभिनेत्रीने या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहून सर्वांना हा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं.

माधुरीने यावेळी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या कलाकारांबरोबर भरपूर धमाल केली. ‘धकधक गर्ल’चं मंचावर आगमन होताच सर्वांना एक खास टास्क देण्यात आला होता. हा टास्क होता माधुरी दीक्षितला इम्प्रेस करण्याचा… जो कोणता सदस्य ‘धकधक गर्ल’ला इम्प्रेस करेल त्याला माधुरी खास भेटवस्तू देईल असं या सोहळ्यात सर्वांना सांगितलं होतं.

यानंतर ‘स्टार प्रवाह’च्या विविध मालिकांमध्ये काम करणाऱ्या जानकी, कला, राया, सावनी, अक्षय, जीवा, भूमी आणि मंदार या सदस्यांना रंगमंचावर आमंत्रित करण्यात आलं. यावेळी माधुरीने एक डान्स स्टेप करून दाखवली. ही स्टेप नंतर या सदस्यांना एकमेकांचं पाहून रिक्रिएट करायची होती. मात्र, माधुरीच्या शास्त्रीय गाण्यावरील ही डान्स स्टेप असल्याने सगळेजण यात असफल ठरले.

माधुरीला यानंतर ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ फेम तेजसने इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला. ‘धकधक गर्ल’साठी गाणं गायल्यावर तेजसने तिच्याबरोबर डान्सही केला. पण, तरीही अभिनेत्रीने त्याला हे गिफ्ट दिलं नाही. याशिवाय जो इम्प्रेस करेल त्याला भेट म्हणून पैंजण देणार असल्याचंही माधुरीने यावेळी जाहीर केलं.

पुढे, मंचावर एन्ट्री घेतली ‘स्टार प्रवाह’च्या चिमुकल्या सदस्यांनी आणि त्यांच्याबरोबर रंगमंचावर आली ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली. ती माधुरीला म्हणाली, “मॅम, तुमच्याकडून मिळणाऱ्या पैंजणांची किंमत आम्ही जाणतो.” सायली व स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या बालकलाकारांनी माधुरीला मराठी परंपरेचं प्रतीक म्हणून कुंकवाचा करंडा दिला. हे गिफ्ट पाहून माधुरी खूपच आनंदी झाली.

माधुरी म्हणाली, “खरंच मराठी परंपरा आणि याचं महत्त्व ‘स्टार प्रवाह’चा प्रत्येक सदस्य जपतो. ही पिढी या मराठी परंपरेला पुढे घेऊन जाणार आहे याचा मला अभिमान वाटतो. म्हणूनच मी आणलेले पैंजण मी या चिमुकल्या मुलींना देणार आहे.” सायलीसह कियारा मंडलिक, ईशा परवडे आणि आरोही सांबरे या मुलींना माधुरीकडून या पुरस्कार सोहळ्यात पैंजण गिफ्ट मिळाले.

माधुरी दीक्षित

दरम्यान, माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला ‘पंचक’ सिनेमा जानेवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिस गाजवल्यावर आता हा सिनेमा टीव्हीवर येत्या १३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.