Madhuri Dixit At Star Pravah Awards : बॉलीवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित यंदाच्या ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिली होती. या सोहळ्याचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं. यामध्ये विविध मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा सन्मान केला जातो. या सोहळ्याला यंदा माधुरी ‘पंचक’ चित्रपटाच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहे. माधुरीची निर्मिती असलेला हा सिनेमा थिएटरनंतर आता ‘स्टार प्रवाह’वर प्रदर्शित होणार आहे.

माधुरी मखमली साडी आणि गळ्यात मोत्याचा नेकलेस घालून सुंदर अशा इंडो-वेस्टर्न लूकमध्ये या सोहळ्याला उपस्थित राहिली होती. यावेळी अभिनेत्रीने माध्यमांशी सुद्धा संवाद साधला. यादरम्यान, माधुरीला छोट्या पडद्यावर म्हणजेच मालिकांमध्ये काम करायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर धकधक गर्ल म्हणाली, “मोठा आणि छोटा पडदा असं काही नसतं. मनोरंजन हे सगळ्या माध्यमातून होतं. मी तर, ओटीटीवर सुद्धा काम केलंय. मला करिअरमध्ये नेहमीच नवनवीन संधी मिळाल्या त्यामुळे यासाठी रोज मी देवाचे आभार मानते. त्यामुळे कोणत्याही माध्यमांवर काम करण्यास मी तयार आहे. सध्या मराठीमधल्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर माझा ‘पंचक’ सिनेमा टेलिव्हिजनवर रिलीज होतोय त्यावर माझं सगळं लक्ष आहे.”

माधुरीला पुढे विचारण्यात आलं, “तुम्हाला कोणती मराठी मालिका आवडते?” यावर अभिनेत्री म्हणाली, “स्टार प्रवाह’ ही वाहिनी सध्या नंबर वनवर आहे. सध्या या वाहिनीवरच्या सगळ्याच मालिका खूप छान आहेत. माझी मामी, मावशी या सगळ्याजणी मला फोन करून सांगत असतात… ही मालिका तू नक्की बघ, ती मालिका नक्की बघ. आता किती मालिका बघणार? मला या वाहिनीवरच्या २-३ मालिका खूप आवडतात.”

“मराठी मालिकांची निर्मिती करायला आवडेल का?” या प्रश्नाचं उत्तर देताना माधुरी म्हणाली, “हो जरूर का नाही आवडणार, मी नक्की निर्मिती करेन.” माधुरी या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने सध्या सगळ्यांच्या मनात या पुरस्कार सोहळ्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा पुरस्कार सोहळा येत्या १६ मार्चला संध्याकाळी ७ वाजता टेलिव्हिजनवर प्रसारित केला जाणार आहे. यासाठी सगळ्याच मालिकांमध्ये चुरस रंगणार आहे. तर, विविध मालिकांमधले लोकप्रिय कलाकार या सोहळ्यात परफॉर्मन्स सुद्धा सादर करतील. त्यामुळे प्रेक्षक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader