अभिनेत्री माधुरी दीक्षित बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेली अनेक वर्ष ती तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदानी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. तर आता लवकरच ती झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावताना दिसणार आहे.
सध्या झी मराठीच्या मालिका विश्वातील पुरस्कार सोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, मालिका आणि इतर पुरस्कार कोण जिंकणार हे पाहता येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला माधुरी दीक्षितही उपस्थित राहणार आहे. त्या दरम्यानचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : माधुरी दीक्षितच्या धाकट्या लेकाची उत्कृष्ट कामगिरी, अभिमान व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…
नुकतेच ‘झी मराठी अवॉर्ड्स’ पार पडले. त्यावेळी माधुरी दीक्षितही आली होती. तिच्या एन्ट्रीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हिरव्या रंगाची पैठणी, मोकळे केस, गळ्यात सुंदर नेकलेस, कपाळावर चंद्रकोर टिकली आणि नाकात छोटीशी नथ असा तिचा मराठमोळा लूक होता. ती येताच तिला मोगऱ्याचा गजरा आणि गुलाबाचं फुल देऊन तिचं स्वागत करण्यात आलं. माधुरीनेही ते अत्यंत नम्रपणे आणि हसतमुखाने स्वीकारलं.
माधुरी दीक्षित या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार असल्यामुळे आता त्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झालेली दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर कमेंट करून नेटकरी माधुरीच्या साधेपणाचं आणि तिने दाखवलेल्या नम्रपणाचं खूप कौतुक करत आहेत. त्यामुळे आता हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना कधी पाहता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.