बीआर चोप्रांच्या ‘महाभारत’ मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी नुकतीच आयएएस पत्नी स्मिता घाटे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये पत्नीपासून विभक्त होण्यासाठी अर्ज केला होता आणि त्यासंदर्भातील निकाल अद्याप प्रलंबित आहे, असं ते म्हणाले होते. आता, कायदेशीर लढाई दरम्यान त्यांनी त्यांच्या दोन मुलींच्या प्रतिक्रियेबद्दल खुलासा केला आहे. नितीश यांनी पुन्हा लग्न करणार का? याचं उत्तर देताना आपला अजूनही विवाह संस्थेवर विश्वास असल्याचं सांगितलं.
‘टेली टॉक इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत मुलाखतकाराने नितीश यांना विचारलं, ‘तुम्ही पुन्हा लग्न करणार आहात का?’ ते म्हणाले, “या लग्नात मला सर्व प्रकारचे अत्याचार सहन करावे लागले. आताही आमच्यातील अडचणींमुळे माझ्या दोन्ही मुली माझ्यापासून दूर नेल्या जात आहेत. माझ्या ११ वर्षांच्या मुलींनी मला सांगितलेल्या फक्त दोन ओळी मी तुम्हाला सांगायचं झालं तर, ‘पप्पा, तुम्हाला आमचे वडील म्हणणं आम्हाला आवडत नाही,’ असं एक मुलगी मला म्हणाली.”
नितीश पुढे म्हणाले, “मी सर्वकाही करून मुली असं का बोलत आहेत?” कारण पालक वेगळे झाल्याचा त्यांच्यावर परिणाम झाला आहे. आज या आव्हानांचा सामना करत असताना पुढे यातून कसा बाहेर पडेल, याची कल्पना नाही. अध्यात्म, तत्त्वज्ञान, ध्यान आणि गुरूंचे आणि जवळच्या मित्रांचे मार्गदर्शन हे मला पुढे जाण्यास मदत करत आहे,” असं त्यांनी नमूद केलं.
“मी पैसे मागत आहे हे खोटं आहे. मी माझे पैसे मागत आहे, माझी फसवणूक झाल्याचं मला वाटतं. त्यामुळे आज ही माझ्या मुलांची लढाई आहे जी मी लढत आहे. मी इतर कोणत्याही महिलेला न्याय देऊ शकेन की नाही हे मला माहीत नाही. विवाह संस्था माझ्यासाठी खास आहे. माझा त्यावर विश्वास आहे. मी माझ्या पालकांच्या लग्नासह खूप यशस्वी लग्नं पाहिली आहेत.”
दरम्यान, नितीश भारद्वाज व आयएएस स्मिता घाटे यांनी एकमेकांशी दुसरं लग्न केलं होतं. दोघांचीही पहिली लग्नं अपयशी राहिली होती. नितीश यांचं पहिलं लग्न मोनिषा पाटीलशी झालं होतं आणि ते २००५ मध्ये विभक्त झाले होते.