Gufi Paintal Passed Away: टीव्ही मालिका ‘महाभारत’मध्ये ‘शकुनी मामा’ची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते गुफी पेंटल यांची प्राणज्योत मालवली आहे. ७८ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर मागील काही दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. गुफी पेंटल यांच्या निधनानंतर चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. गुफी पेंटल यांचं आयुष्य फार रंजक होतं. इंजिनिअरींगचं शिक्षण, भारतीय सैन्यात नोकरी ते अभिनेते त्यांचा हा प्रवास जाणून घेऊयात.
‘महाभारत’मधील ‘शकुनी मामा’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं निधन
गुफी पेंटल यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९४४ रोजी पंजाबमध्ये झाला होता. गुफी पेंटलला कंवरजीत पेंटल नावाचा एक लहान भाऊ देखील आहे. गुफी पेंटल यांनी ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत भारतीय सैन्यातील अनुभव सांगितले होते. १९६२ मध्ये जेव्हा भारत आणि चीनदरम्यान युद्ध सुरू होते, तेव्हा ते इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होते. पण त्यांचे स्वप्न सैन्यात भरती होण्याचे होते. अशातच त्यांच्या कॉलेजमध्ये सैन्यात भरती सुरू होती. त्या माध्यमातून ते सैन्यात भरती झाले आणि त्यांचं पहिलं पोस्टिंग चीनच्या सीमेवर होतं.
हेही वाचा – “त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन
चीनच्या सीमेवर असताना जवान एकमेकांचे मनोरंजनासाठी रामलीला करत असत. त्या रामलीलेत गुफी सीतेची भूमिका साकारत असे. इथूनच त्यांना अभिनय आवडू लागला, मग अभिनयात नशीब आजमावण्यासाठी गुफी पेंटल १९६९ मध्ये मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर गूफी पेंटल यांनी मॉडेलिंग सुरू केले आणि चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. १९७५ मध्ये गुफी पेंटल यांना पहिला चित्रपट मिळाला. ‘रफुचक्कर’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
हेही वाचा – Video: अमिताभ बच्चन यांची नात ‘गली बॉय’ फेम अभिनेत्याला करतेय डेट? दोघांचा व्हिडीओ व्हायरल
त्यानंतर ‘दिल्लगी’, ‘देस परदेस’, ‘दावा’, ‘सुहाग’ आणि ‘घूम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. पण गुफी यांना चित्रपटांमधून अपेक्षित लोकप्रियता मिळाली नाही. त्यांनी अनेक मालिकांमध्येही काम केलं होतं. १९८८ मध्ये त्यांना बी.आर. चोप्रांच्या ‘महाभारत’मध्ये शकुनी मामाची भूमिका मिळाली. या पात्राने गुफी पेंटल यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.