छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून शिवाली परबला ओळखले जाते. शिवालीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अफलातून अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते. नुकतंच शिवालीने तिचे कुटुंब आणि आई-वडील यांच्याबद्दल सांगितले आहे.
शिवाली परबने नुकतंच ‘सकाळ पॉडकास्ट’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिचा आजवरचा प्रवास, हास्यजत्रेतील गमतीजमती यांसह कुटुंबाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्याबद्दल तिने भाष्य केले.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, म्हणाली…
“मी खूप मध्यमवर्गीय कुटुंबात राहिली आहे. मी एका चाळीत राहायचे. मला याचं अजिबात काहीही दु:ख वैगरे नाही. आपण फक्त टीव्ही पाहत असतो. मी कधीही कोणत्याही कलाकाराला आतापर्यंत भेटलेले नाही. शूटींग, सेटअप, आर्टिस्ट कसे असतात काय, याची मला अजिबातच कल्पना नव्हती. मला लहान असताना स्टेजवर नाचायला वैगरे खूप आवडायंच.
माझे वडील रिक्षा चालवतात. माझी आई गृहिणी आहे. ती घरी कपड्यांचे शिवणकाम करणं, माळ बनवणं वैगरे अशी काम करायची. त्यामुळे माझे कुटुंबिय अगदीच मध्यमवर्गीय होते. त्यानंतर मग माझ्या आयुष्यात हास्यजत्रेची संधी आली. त्यामुळे खूप मोठा बदल झाला. मला हे शब्दात मांडता येणार नाही.
मी हास्यजत्रेत असल्याने सर्व गोष्टी सुरळीत सुरु आहेत. त्यांना ही काम करावी लागत नाही. त्यामुळे माझ्यासाठी हा खरंच आनंदाचा क्षण आहे”, असे शिवालीने म्हटले.
दरम्यान शिवाली परबने ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटात काम केले होते. यात ती मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटाची निर्मिती ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी केली आहे.
आणखी वाचा : “चार वर्ष एकत्र…” शिवाली परबची खास पोस्ट, प्रियदर्शनी कमेंट करत म्हणाली “तुझं प्रेम…”
अभिजीत वारंग दिग्दर्शित ‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटात शिवालीसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर हे कलाकारही झळकले होते.