Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली. या शोमधील काही कलाकार रंगभूमीवर ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकात महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. या नव्या नाटकात अभिनेता प्रसाद खांडेकर, शिवाली परब, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सध्या ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाला प्रेक्षकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. २३ फेब्रुवारीला या नाटकाची सगळी टीम प्रयोगादरम्यान एकत्र बसमधून प्रवास करत होती. याच दिवशी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना सुरू होता. या सामना संपूर्ण देशभरातली क्रिकेटप्रेमी लाइव्ह पाहत होते. भारताने पाकिस्तानचा पराभव करत ६ विकेट्सने विजय मिळवला. याशिवाय शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीने विजयी चौकार लगावत आपलं ५१वं वनडे शतक देखील पूर्ण केलं आहे. हा क्षण सर्व भारतीयांसाठी खास होता. विराटचं शतक आणि भारतीय संघाचा विजय झाल्यावर संपूर्ण देशभरात जल्लोष करण्यात आला.
सामान्य लोकांप्रमाणे सेलिब्रिटी देखील क्रिकेटप्रेमी असतात. प्रयोगादरम्यान बसने प्रवास करताना ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाची टीम सुद्धा मॅच पाहत होती. टीम इंडियाचा विजय झाल्यावर प्रसाद खांडेकर, शिवाली परब, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव या सगळ्या कलाकारांनी एकच जल्लोष केला. बसमध्येच या सगळ्यांनी ‘झिंगाट’ गाण्यावर जबरदस्त एनर्जीसह डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रसाद खांडेकरने कलाकारांच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो लिहितो, “…आणि अशाप्रकारे भारतीय संघ जिंकल्यावर नाटकाची बस रस्त्यात बाजूला थांबवून ‘थेट तुमच्या घरातून’ नाटक मंडळाने विजय साजरा केला आहे.”
दरम्यान, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल सांगायचं झालं, तर विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानं त्यांचं चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील आव्हान संपुष्टात आलं आहे.