‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून ओंकार भोजनेने अचानक एक्झिट घेतली होती. या शोमधून तो बाहेर पडल्याने प्रचंड चर्चा झाली. प्रेक्षक सातत्याने ओंकारबद्दल सोशल मीडियावर बोलत होते. प्रेक्षकांना ओंकारचं शो सोडणं रुचलं नव्हतं. नंतर तो ‘फू बाई फू’मध्ये गेला, तेव्हा त्याला खूप ट्रोल केलं गेलं. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांनी याबद्दल भाष्य केलं आहे.
सचिन मोटेंनी केलं ओंकारचं कौतुक
दोन्ही दिग्दर्शकांनी ओंकार भोजनेचं कौतुक केलं आहे. ओंकार खूप विनम्र व्यक्ती असल्याचं मोटे म्हणाले. सचिन गोस्वामी व सचिन मोटे भार्गवी चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “ओंकार भोजने खूप नम्र व्यक्ती आहे. जेव्हा आम्ही करोना काळात सर्वांचं मानधन वाढवलं होतं, तेव्हा ओंकार स्वतः म्हणाला होता, ‘सर शक्य नसेल तर माझं नका वाढवू, कारण आधीच ओढाताण चाललीये, त्यात तुम्ही आम्हाला मानधन वाढवून देताय.'”
ओंकार भोजनेने शो का सोडला?
“खरं तर कामाचा दबाव होता, त्यामुळे त्याला शो सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. ओंकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडून गेलाय, पण आमचं अजुनही बोलणं होतं. राजकीय वातावरणामुळे लोकांना असं वाटतं की जातोय म्हणजे दुखावून जातोय, पण तसं नसतं. प्रत्येकाच्या काही कमिटमेंट्स असतात. हास्यजत्रा खूप लोकप्रिय आहे, ती खूप लोकांपर्यंत पोहोचते, साहजिकच ती सिनेक्षेत्रातील कास्टिंग डायरेक्टर्सकडेही पोहोचते. त्यांचंही तिकडेच लक्ष असतं, मग कलाकारांसाठी वेगवेगळ्या संधी येतात.”
ओंकारला लोकांनी ट्रोल करायला नको होतं
“ओंकार भोजने ‘फू बाई फू’मध्ये गेला, याचं प्रेक्षकांना खूप वाईट वाटलं. मग लोकांनी त्याला ट्रोल केलं, जे व्हायला नको होतं. खरं तर हास्यजत्रा सोडल्यानंतरही तो हास्यजत्रेशी संबंधित कुठल्याही गोष्टी असल्या तरी भेटतो. अगदी समीर चौघुलेचा वाढदिवस, वनिता खरात तसेच दत्तूचं लग्न असो. आता त्याला त्याच्या कामासाठी वेळ हवाय, त्याला वाटेल तेव्हा तो सांगेल की आता आपण एकत्र काम करायचं, तेव्हा गोष्टी जमून आल्या तर आम्ही पुन्हा एकत्र काम करू,” असं सचिन गोस्वामी व सचिन मोटे म्हणाले.