प्रसाद ओक हा उत्तम अभिनेता तर आहेच परंतु, गेल्या काही वर्षात एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ अशा दर्जेदार कलाकृतींची निर्मिती प्रसादने केली आहे. सध्या अभिनेता आणखी काही प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. अभिनय व दिग्दर्शनाव्यतिरिक्त तो गेल्या काही वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात परीक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने, ओंकार भोजने असे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. यामधील विनोदवीरांच्या स्किट्सवर परीक्षक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर खळखळून हसत असतात. या कार्यक्रमाच्या यशाचं संपूर्ण श्रेय प्रसादने अनेकदा या कार्यक्रमाच्या दिग्दर्शकांना दिलं आहे.
सचिन मोटे व सचिन गोस्वामी हे दिग्गज दिग्दर्शक या कार्यक्रमाचं दिग्दर्शन करत आहेत. दिवाळीनिमित्त या दोघांनी प्रसाद ओकसाठी खास भेटवस्तू पाठवली आहे. प्रसादने या भेटवस्तूंचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत दोन्ही दिग्दर्शकांचे “धन्यवाद…!!!” म्हणत आभार मानले आहेत. प्रसादने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देणारं कार्ड, तर दुसऱ्या फोटोमध्ये महागडे एअरपॉड्स पाहायला मिळत आहेत. या दोन्ही फोटोंमध्ये अभिनेत्याने दोन्ही दिग्दर्शकांना टॅग केलं आहे.
दरम्यान, आता लवकरच अभिनेता प्रसाद ओक ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ‘वडापाव’, ‘पठ्ठे बापूराव’ या कलाकृतींच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसाद ओकने हाती घेतली आहे.