Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane : आपल्या हक्काचं घर आणि गाडी असावी असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. गेल्या काही वर्षात मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी नवीन घरं आणि गाड्या खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. आता आणखी एका मराठी अभिनेत्याचं घरासह नव्या गाडीचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता रोहित माने याने काही दिवसांपूर्वीच नवीन घर खरेदी केलं होतं. आता या पाठोपाठ अभिनेत्याच्या घरी ‘THAR’ या नव्या गाडीचं आगमन झालेलं आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले. यापैकीच एक म्हणजे रोहित माने. रोहितने गेल्यावर्षी आपल्या पत्नीसह नव्या घरात गृहप्रवेश केला होता. आता नव्या गाडीमुळे अभिनेत्याचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं आहे.
रोहित हा मूळचा साताऱ्याचा आहे. त्यामुळे गाडी खरेदी करतानाच्या व्हिडीओला त्याने “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी” असं हटके कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्यासह त्याचं संपूर्ण कुटुंब ही गाडी खरेदी करताना उपस्थित होतं. रोहितने बायकोसह या नव्या थारची शोरुममध्ये पूजा केली आणि त्यानंतर गाडीसह फोटोशूट केलं. याशिवाय अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी देखील या नव्या गाडीची पूजा केली. या स्वप्नपूर्तीचा आनंद रोहित अन् श्रद्धाच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसत आहे.
हेही वाचा : लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
रोहितच्या या नव्या गाडीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. निखिल बने, प्रियदर्शिनी इंदलकर, चेतना भट, वनिता खरात, चेतन गुरव, ऋजुता देशमुख, पृथ्वीक प्रताप, स्नेहल शिदम, नम्रता प्रधान या सगळ्या कलाकारांनी रोहितच्या व्हिडीओवर कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर नेटकऱ्यांनी सुद्धा या नव्या गाडीसाठी रोहितचं भरभरून कौतुक केलं आहे. अनेकांनी “व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला अशीच प्रगती कर” असं कमेंट्समध्ये म्हटलं आहे.