‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले. अभिनेते समीर चौघुलेंना या कार्यक्रमामुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. अभिनयाबरोबरच ते उत्तम लेखक म्हणून देखील ओळखले जातात. हास्यजत्रेतील अनेक गाजलेल्या स्किटचं लेखन समीर चौघुलेंनी केलेलं आहे.
अभिनेते कामाव्यतिरिक्त सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये समीर चौघुलेंनी त्यांच्या चाहत्याच्या अनुभव सांगितला आहे.
हेही वाचा : Video: आयरा खान व नुपूर शिखरे उदयपूरमध्ये अडकले लग्नबंधनात, पहिला व्हिडीओ आला समोर
समीर चौघुलेंची पोस्ट
हे असे चाहते आहेत म्हणून जगण्याला अर्थ आहे…लहानपणी माझ्या घराच्या भिंतीवर मी माझ्या आवडत्या हिरोंचे फोटो लावायचो…अमिताभ बच्चन, ब्रूस ली, जॅकी चॅन, पु.ल. देशपांडे, चार्ली चॅप्लिन (द कीड), कपिल देव यांचा (८३ चा वर्ल्ड कप उचललेला) असे अनेक फोटो माझ्या घराच्या भिंतीवर, गद्रेच्या लोखंडी कपाटावर असायचे..तेव्हा खरंच वाटलं नव्हतं कोणी माझा फोटो आपल्या घराच्या भिंतीवर लावेल….निखिल माने या माझ्या चाहत्याने माझ्या प्रेमापोटी माझे चित्र (हस्त आणि हसत चित्र) आपल्या घरातील भिंतीवर लावले आहे…माझ्यासाठी ही अत्यंतिक आनंदाची बाब आहे…स्ट्रेस आणि नैराश्याने भरलेल्या जीवनात आपण नकळतपणे अनेकांच्या मनाला उभारी, positivity, आनंद मिळण्याचे निमित्त ठरतो ही गोष्ट कधी कधी गहिवरून टाकते…आणि चाहत्यांचं प्रेम गुदमरवून टाकतं… हास्याची ताकद किती मोठी आहे याची प्रचिती देणारी असंख्य उदाहरणे आम्ही हास्यजत्रेकरी रोज अनुभवतो…हे असे चाहते आणि त्यांचे प्रेम आमची कामाप्रती responsibility वाढवतात आणि विनोदाकडे जास्त गांभीर्याने पाहायला लावतात. प्रत्येक प्रहसनात ५०० टकके योगदान द्यायची उर्मी निर्माण करतात…प्रत्येक प्रयत्न सफल होतोच असं नाही..कधी उन्नीस बीस होतंच…पण १०० टक्के प्रयत्न आणि मेहनत करण्यात आम्ही कधीच compromise करत नाही…हे संपूर्ण श्रेय आमच्या हास्यजत्रेच्या कुटुंबाचे आहे…आणि आमच्या सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांचे ..तसेच सोनी मराठी या वाहिनीचे आहे…मी निखिल माने यांचे मनापासून आभार मानतो..खूप खूप प्रेम!
हेही वाचा : “पैसा आणि दहशतीच्या बळावर राजकीय सत्ता हिसकावणं सोपं असतं, पण…”; निकालानंतर किरण मानेंची पोस्ट चर्चेत
दरम्यान, समीर चौघुलेंच्या पोस्टवर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंजिरी ओक, सुकन्या मोने, अभिजीत खांडकेकर, प्रियदर्शनी इंदलकर, प्राजक्ता माळी यांनी समीर चौघुलेंचं भरभरून कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.