Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचे जगभरात चाहते आहेत. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले. शिवाली परब, निखिल बने, रोहित माने, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर, पृथ्वीक प्रताप या सगळ्या कलाकारांना या शोमुळे एक नवीन ओळख मिळाली. हास्यजत्रेशिवाय हे सगळे कलाकार विविध माध्यमांतून आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. आता या शोमधील एक अभिनेता लवकरच कोळीगीतावर थिरकणार आहे. हा अभिनेता कोण आहे जाणून घेऊयात…
मराठी नाटक, चित्रपट आणि हास्यजत्रेमुळे ( maharashtrachi hasya jatra ) अभिनेता पृथ्वीक प्रतापला घराघरांत लोकप्रियता मिळाली. आता लवकरच तो कोळीगीतावर थिरकणार आहे. यासंदर्भात पृथ्वीकने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. याशिवाय या पोस्टसह त्याचा कोळी लूक देखील प्रेक्षकांसमोर आला आहे.
हेही वाचा : TRP च्या शर्यतीत कोणी मारली बाजी? टॉप ५ ठरल्या स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिका, तर ‘झी मराठी’…; पाहा संपूर्ण यादी
पृथ्वीक प्रतापची पोस्ट
‘पोरी तुझ्या नावाचा गो’
माझा मामा ‘महेंद्र कांबळे’ अत्यंत रसिक माणूस… CST la हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये तो कामाला होता… कामावरून घरी येताना नेहमी स्टेशन जवळून वेगवेगळ्या सिनेमाच्या – गाण्याच्या CD’s तो ३० रुपयाला विकत घ्यायचा. नेहमीचा गिऱ्हाईक म्हणून बऱ्याचदा २ रूपये सवलत सु्द्धा त्याला मिळायची. त्यातही त्याचा जास्त भर कोळीगीते, भीमगीते आणि लावणी यावर असायचा आणि त्यामुळेच माझं संपूर्ण बालपण ‘कृणाल, व्हीनस, टी-सीरीज, टीप्स’ यांनी तयार केलेली वेगवेगळी गाणी ऐकण्यात गेलं. त्यातले काही कलाकार मला अजूनही खूप आवडतात. आपण सुद्धा त्यांच्यासारखं कधीतरी एखादं कोळीगीत सादर करावं असं सतत वाटायचं… मामासुद्धा नेहमी म्हणायचा एखाद्या कोळीगीतामध्ये दिसं रे. मी शाहरूख खानला भेटलो हे ऐकल्यावर पण, त्याला जेवढा आनंद नव्हता झाला त्यापेक्षा दुप्पट आनंद त्याला मी एक कोळीगीत करतोय हे ऐकल्यावर झालाय. तेच कोळीगीत लवकरच तुमच्या सगळ्यांच्या भेटीला घेऊन येतोय. प्रेम आणि आशिर्वाद कायम असू द्या. कारण पहिल्यांदाच माझ्या चौकटी बाहेरचं काहीतरी करतोय. चुकलं माकलं तर मोठ्या मनाने समजून घ्या.
दरम्यान, पृथ्वीकच्या ( maharashtrachi hasya jatra ) या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मस्त दादा”, “१ नंबर होणार काळजी नको करूस”, “संपला विषय हार्ड”, “अभिनंदन दादा” अशा कमेंट्स करत चाहत्यांनी अभिनेत्याला या गाण्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आता पृथ्वीकचं ‘पोरी तुझ्या नावाचा गो’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.