Maharashtrachi Hasya Jatra Fame Actress : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. या शोमुळे अनेक नवोदित कलाकारांना एक नवीन ओळख मिळाली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत हे सगळे कलाकार गेली अनेक वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

हास्यजत्रेच्या कलाकारांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकारांविषयी जास्तीत जास्त जाणून घेण्याची इच्छा असते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोद्वारे प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री ईशा डेने तिचं आडनाव बदललं आहे. अभिनेत्रीने हा निर्णय का घेतला, तिचं मूळ आडनाव नेमकं काय होतं. याबद्दल ईशाने डॉ. आनंद नाडकर्णी यांना दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

ईशा तिच्या आडनावाचा किस्सा सांगत म्हणते, “माझं खरं नाव ईशा वडनेरकर आहे. मी ‘ड्रामा स्टुडिओ लंडन’ येथे प्रशिक्षण घेत होते तेव्हाचा हा किस्सा आहे. लंडनमध्ये ‘Stage Name’ किंवा ‘Screen Name’ घेण्याची पद्धत आहे. माझा कोर्स अंतिम टप्प्यात आला होता, तेव्हा मी कास्टिंगच्या ऑडिशन्सला जायला लागले. त्या ऑडिशन देताना मला दोन-तीन अनुभव आले. मला विचारलं जायचं तुझं नाव काय आहे. ( इंग्रजीत प्रश्न विचारण्यात आले )”

“ऑडिशनला ठरल्याप्रमाणे माझं नाव विचारायचे आणि यानंतर लगेच मी माझं नाव सांगायचे ईशा वडनेरकर… मग ते समोरून मला विचारायचे नेमकं काय म्हणालीस? ‘वड, वडनेर…नक्की ‘व’ की ‘व्व?’ असे खूप किस्से घडायचे…या गमतीशीर गोष्टी चालू राहायच्या. याठिकाणी माझे ट्यूटर सुद्धा होते, जॉनी केंम असं त्यांचं नाव होतं. त्यांना मी हे सगळं सांगितलं तेव्हा ते म्हणाले, इथे सगळेजण स्टेज नेम घेतात. तुला हवं तर ठेव काहीतरी वेगळं नाव. मलाही वाटलं अरे ठिके…काय हरकत आहे? मग मी अनेक आडनावं काढली. मग मला असं वाटलं ईशा डे…हे नाव ऐकण्यासाठी छान वाटतंय. ‘ईशा डे’ ऐकूनच काहीतरी छान वाटलं. त्यामुळे हे नाव मी निवडलं.” असं ईशाने यावेळी सांगितलं.

isha dey
अभिनेत्री ईशा डे

दरम्यान, ईशा डेच्या कामाबद्दल सांगायंच झालं, तर हास्यजत्रेशिवाय प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री लवकरच ‘गुलकंद’ या सिनेमात झळकणार आहे. हा चित्रपट १ मे पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्यासह सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौघुले हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Story img Loader