विनोदाचं अचूक टायमिंग साधत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून गौरव मोरेला ओळखलं जातं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. गेल्या काही महिन्यात गौरवची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता मराठीशिवाय तो हिंदी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहे. ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोमध्ये गौरव प्रेक्षकांना खळखळून हसवत असल्याचं गेल्या काही भागांमध्ये पाहायला मिळालं.
गौरव वैयक्तिक आयुष्यात मोठे कष्ट करून पुढे आला आहे. त्याला फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून देखील ओळखलं जातं. सामान्य माणसांप्रमाणे गौरवचं सुद्धा हक्काची गाडी खरेदी करण्याचं स्वप्न होतं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मॅडनेस मचाएंगे’च्या भागात अभिनेत्याने त्याच्या पहिल्या गाडीची आठवण प्रेक्षकांना सांगितली आहे. त्याने सांगितलेला प्रसंग ऐकून उपस्थित सगळेच प्रेक्षक भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
गौरव मोरे म्हणाला, “बाहेर फिरायला जाताना, नेहमी असं वाटायचं अरे आपल्याकडे गाडी असली पाहिजे होती. बस, ट्रेनचा प्रवास मला नक्कीच आवडतो. मी आताही तसा प्रवास करू शकतो. पण, माझे वडील नेहमी बोलायचे आपल्या घरात चारचाकी पाहिजे. तेव्हापासून मी ठरवलं होतं की, सेकंड हँड असली तरीही आपल्या घरात चारचाकी गाडी आली पाहिजे. कारण लोकांना काय वाटतं ज्याच्या घरासमोर कार तो मोठा माणूस… मी एका शोमध्ये काम करत होतो. तिथे काम करून मी पैसे साठवले आणि गाडी घ्यायचं ठरवलं.”
हेही वाचा : “तेव्हा माझं करिअर संपेल”, सलमान खानने ३४ वर्षांपूर्वी लिहिलेलं ‘ते’ पत्र व्हायरल; चाहत्यांना म्हणाला होता…
“गाडी घ्यायचं ठरवलं तेव्हा समोरचा माणूस बोलला दीड लाखात कार देईन. मी म्हणालो, ‘बघ माझ्याकडे फक्त १ लाख १० हजार आहेत त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही.’ मी माझ्या आईला त्याच्याकडे घेऊन गेलो की, निदान आईचं ऐकून तो पैसे कमी करेल. त्याला सांगितलं काही करून ही गाडी मला पाहिजे. माझी आईपण त्याला बोलली आम्हाला गाडी घ्यायचीच आहे. त्यावेळी ती गाडी पाहण्यासाठी मी आणि माझी आई ऐरोलीला गेलो होतो. बाबांची इच्छा होती म्हणून गाडी घेतली पण, तो आनंद पाहण्यासाठी माझे बाबा नव्हते. २०१५ मध्ये बाबा गेले…गाडी थोडी उशिरा घेतली. केव्हा-केव्हा वाईट वाटतं आज माझे बाबा सोडून सगळेजण माझ्या गाडीत बसतात. आपण नवीन गोष्टी विकत घेतो. पण, आपण ज्यांच्यासाठी या गोष्टी घेतो ते लोक तरी आपल्याबरोबर पाहिजेत. पण, आता नवीन गाडी घेतल्यावर बाबांचा फोटो माझ्याबरोबर ठेऊन चला असे तरी एकत्र फिरुया असा विचार करून मी माझं समाधान करून घेतो. आज फक्त बाबांच्या आशीर्वादामुळे या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत.” असं गौरव मोरेने सांगितलं.