‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे आज गौरव मोरे घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे त्याला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अशी ओळख देखील मिळाली. हास्यजत्रा गाजवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच गौरवने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. येत्या काळात अभिनेता अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहे. परंतु, उल्हासनगरचं बालपण ते लोकप्रिय अभिनेता हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. गौरवने नुकतीच राजश्री मराठीच्या ‘त्याची गोष्ट’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्याने बालपण, वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाविषयी भाष्य केलं.
गौरव मोरे म्हणाला, “आम्ही सगळ्यात आधी उल्हासनगरला स्टेशनच्या बाजूला ताडपत्री असलेल्या घरात राहायचो. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही विठ्ठलवाडी स्टेशनजवळ पुन्हा तसेच राहू लागलो. पण, माझी आई सांगते तसं तिकडच्या वातावरणाचा मला त्रास झाला म्हणून नंतर आम्ही कल्याणला राहायला आलो. त्याच दरम्यान माझ्या वडिलांची बदली भांडुपला झाली मग, त्यांनी फिल्टरपाड्यात राहण्यासाठी जागा पाहिली. तिथेही तसंच ताडपत्रीचं घर होतं. ताडपत्री म्हणजे ताडाच्या झाडाचं लाकूड वापरून ही घरं त्यावेळी बनवली जायची. पण, पाऊस पडला की खूप अडचण व्हायची. आमच्या घरचा एकजण पाणी साचू नये म्हणून घरात टोप लावून बसायचा.”
गौरव पुढे म्हणाला, “सुरुवातीच्या काळात रंगाने सावळा आणि उंचीला बुटका असल्याने मला खूप दडपण यायचं. त्यानंतर शाळेत आठवीत गेल्यावर मी थोडा सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागू लागलो. अनेकांच्या मिमिक्री करायचो…मग माझे मित्र झाले. मी एकदा लहानपणी शेजारी टीव्ही पाहण्यासाठी गेलो होतो पण, त्यांनी मला घराच्या बाहेर हाकललं. ही गोष्ट नेमकी माझ्या आईने पाहिली आणि ती म्हणाली, तू का गेलाय तिकडे? तिने मला यावरुन मारलं सुद्धा होतं. त्या काळात टीव्ही घेणं ही गोष्ट फार मोठी होती. तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य नसल्याने ४ ते ५ दिवस मी टीव्हीसाठी रडत होतो.”
हेही वाचा : रितेश विलासराव देशमुख : मुख्यमंत्री वडिलांचा सल्ला मानला अन् लातूरच्या हिरोने महाराष्ट्राला ‘वेड’ लावलं
“एक दिवस शाळेच्या मधल्या सुट्टीत बहिणीने मला आपल्या घरी टीव्ही आलाय असं सांगितलं. कधी ५.३० वाजतात आणि कधी घरी जातो असं मला झालेलं. कारण, तेव्हा मला टीव्हीचा रिमोर्ट हातात घ्यायची फार इच्छा होती. शाळेतून घरी गेल्यावर मी पहाटे ४ वाजेपर्यंत टीव्ही पाहत होतो. माझ्या सगळ्या मित्रांना आमच्याकडे टीव्ही आलाय असं मी सांगून ठेवलं होतं. आईला मी लहानपणी खूप घाबरायचो. तिची फक्त एकच इच्छा होती…याला वाईट संगत नको लागायला आणि आईच्या त्याच भीतीमुळे मी आजवर इथे पोहोचलो आहे. आता गेल्या दोन वर्षांपासून घरची परिस्थिती आधीपेक्षा खूप सुधारली आहे पण, मला त्या गोष्टीचा मी अजिबात माज करणार नाही. कारण, लहानपणी तुम्ही जे शिकता, जे तुमच्या मनात साचतं ते आयुष्यभर तसंच राहतं. आपले आई-बाबा मेहनत करतात ती परिस्थिती आपण सुधारायची हे मी आधीपासूनचं ठरवलं होतं.” असं गौरव मोरेने सांगितलं.