‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरेला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. आपल्या विनोदी शैलीमुळे फिल्टरपाड्याचा बच्चन अल्पावधीतच प्रसिद्धीझोतात आला. आपल्या विनोदबुद्धीने तो प्रत्येकाला पोट धरून हसायला भाग पाडतो. छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळाल्यावर गौरव चित्रपटांकडे वळला. त्याने नुकतीच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या गप्पामस्ती पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाबद्दल अनेक खुलासे केले.
गेल्या काही दिवसांपासून गौरव मोरे त्याच्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे व हास्यजत्रेत फारसा दिसत नाही. त्यामुळे भार्गवीने त्याला “तू ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडलीस?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेता म्हणाला, “हा कार्यक्रम मी सोडलेला नाही. माझ्या खांद्याला दुखापत झाली असल्याने मी थोडे दिवस हास्यजत्रेतून ब्रेक घेतला आहे.”
गौरव मोरे पुढे म्हणाला, “सध्या या दुखापतीमुळे मी दोन ते तीन महिन्यांच्या ब्रेकवर आहे. कारण, एखादं स्किट सादर करताना ओढाताण होते. माझे स्किट पाहणाऱ्या प्रेक्षकांना आता माहितीच असेल की, माझ्या सगळ्या स्किटमध्ये मारधाड असते. सतत हालचाल केल्यामुळे खांदा अधिक दुखावू शकतो. हेच हास्यजत्रेतून ब्रेक घेण्याचं हेच मूळ कारण आहे. याशिवाय या दरम्यान माझ्या एका सिनेमाचं शूटिंग सुद्धा होतं. त्याच्यासाठी मला ३० ते ३५ दिवसांचा वेळ काढावा लागणार आहे.”
हेही वाचा : ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेला वाटते ‘या’ गोष्टीची भीती; म्हणाली, “९९ टक्के ऑडिशन्समध्ये…”
“दुखापत आणि सलग शूटिंग या दोन कारणांमुळे मी काही दिवस हास्यजत्रेतून ब्रेक घेतला आहे. तीन महिन्यांचा ब्रेक घेतो असं मी सरांना आधीच सांगून ठेवलंय. खांदा बरा होईपर्यंत आरामच करेन अन्यथा हे दुखणं असंच वाढत जाणार” असं गौरव मोरेने सांगितलं.