अभिनेत्री नम्रता संभेरावने वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नम्रताला सर्वत्र लॉली ही नवीन ओळख मिळाली. प्रत्येक कलाकाराला शूटिंगमधून वेळ काढून कुटुंबाच्या जवळ राहणं खूप महत्त्वाचं असतं. खऱ्या आयुष्यात अभिनेत्री एक पत्नी, आई, मैत्रीण अशा सगळ्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळते.
नम्रताला रुद्राज नावाचा एक लहान मुलगा आहे. शूटिंगमुळे अनेकदा तिला मुलासाठी वेळ काढता येत नाही. परंतु, घरी असल्यावर ती लाडक्या लेकाचे सगळे हट्टे पुरवते. रुद्राज आता खूपच हुशार झाल्याचं अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
नम्रताने रुद्राजचा एक गोड व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तो त्याच्या आजीपासून लपवून सरबत पित असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री त्याला, “तुला हे कोणी शिकवलं असं विचारते?” यावर रुद्राज म्हणतो,”माझा मीच शिकलो…आजीला मी पाणी पित आहे असं सांगितलंय…आता माझी ॲक्टिंग बघा.”
हेही वाचा : रश्मिकानंतर कतरिना कैफचा डीपफेक फोटो व्हायरल, ‘टायगर ३’ मधील टॉवेल सीन केला मॉर्फ
पुढे, नम्रता संभेराव लेकाला म्हणते, “अरे तुझी ॲक्टिंग फ्लॉप आहे.” यावर रुद्राज चटकन उत्तर देतो, “माझी नाही आई तुझी रेकॉर्डिंग फ्लॉप आहे. तूच स्वत:च्या हाताने बोलली.” लेकाचं हे मजेशीर उत्तर ऐकून नम्रता हसते आणि त्याला हाताने कधी बोलतात का? असा प्रश्न विचारते.
नम्रता व रुद्राजचा हा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या व्हिडीओवर “अगं बाई किती गोड आहे हा”, “आजीला कळालं की नाही त्याचं सीक्रेट”, “रुद्राज खूप गोड आहेस” अशा कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, नम्रता सध्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.