‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. शिवाली परब, नम्रता संभेराव, वनिता खरात, पृथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने, ओंकार राऊत या विनोदवीरांना अल्पावधीतच प्रेक्षकांनी आपलंसं केलं आहे. परंतु, या विनोदवीरांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाची सुरूवात मुख्यत: महाविद्यालयातील एकांकिका स्पर्धांमुळे झाली. प्रायोगिक नाटकांमध्ये काम करून हे कलाकार घडले आणि आजच्या घडीला महाराष्ट्रातील प्रेक्षकांना ते खळखळून हसवत आहेत.
‘हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव आणि रसिका वेंगुर्लेकर हा दोघी अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या खास मैत्रिणी आहेत. या तिन्ही अभिनेत्री एकाच महाविद्यालयात होत्या. जुन्या आठवणींना उजाळा देत नम्रताने रसिका आणि ऋतुजासह खास फोटो शेअर केला आहे.
“२००७ पासून आम्ही एकत्र आहोत…आमच्या मैत्रीला आता १६ वर्ष पूर्ण झालेली आहेत. आम्ही MD च्या हुशार पोरी” असं कॅप्शन अभिनेत्री नम्रता संभेरावने या फोटोला दिलं आहे. या अभिनेत्रींचं शिक्षण महर्षी दयानंद महाविद्यालय परळ अर्थात एमडी कॉलेजमधून पूर्ण झालेलं आहे. “नाटकात काम करण्याची इच्छा असल्याने मी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता” असं रसिकाने मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
हेही वाचा : ‘श्यामची आई’ चित्रपट ‘या’ महिन्यात होणार प्रदर्शित, पहिलं पोस्टर समोर
‘अंकुश’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री ऋतुजा बागवेने हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी या तिन्ही अभिनेत्रींनी जुन्या आठवणींना उजाळा देत हे खास फोटोसेशन केलं होतं. दरम्यान, या अभिनेत्रींच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच अभिनेत्री नम्रता संभेराव ‘एकदा येऊन तर बघा’ आणि ऋतुजा बागवे ‘अंकुश’ चित्रपटाच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.