‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेत्री नम्रता संभेरावला एक वेगळी ओळख मिळाली. घराघरांत तिला ‘लॉली’ आणि नमा ताई या नावाने ओळखलं जाऊ लागलं. उत्तम अभिनयाबरोबरच नम्रता तिच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखली जाते. वैयक्तिक आयुष्यात २०१३ मध्ये तिने योगेश संभेराव यांच्याशी लग्नगाठ बांधली. पुढे लग्नानंतर सहा वर्षांनी तिला रुद्राज झाला. हास्यजत्रा आणि वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांविषयी अभिनेत्रीने अलीकडेच ‘मित्रम्हणे’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नम्रता संभेराव म्हणाली, “गरोदर असल्याचं समजल्यावर मी ही गुडन्यूज आमचे दिग्दर्शक सचिन मोटे यांना सांगितली. सुरूवातीला त्यांना काय प्रतिक्रिया देऊ हे कळालंच नाही कारण, त्या क्षणाला एकीकडे ते आमचे निर्माते-दिग्दर्शक म्हणून आणि दुसरीकडे माझे एक गुरुमित्र म्हणून विचार करत होते. आता नमा गरोदर असल्यामुळे इथून पुढे ती हास्यजत्रेत नसणार असा विचार त्यांच्या डोक्यात सुरू झाला. पण, वैयक्तिकरित्या माझ्यासाठी ते प्रचंड आनंदी होते. कारण, जवळपास सहा वर्षांनी मी आई होणार होते. अनेक वर्ष प्रयत्न करूनही ती गोष्ट होत नव्हती म्हणून मी गरोदर असल्याचं कळाल्यावर सगळेच माझ्यासाठी आनंदी होते.”

हेही वाचा : Video: अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरात देणार गुडन्यूज? प्रेग्नेंसी टेस्टची चर्चा, म्हणाली…

नम्रता संभेराव पुढे म्हणाली, “या संपूर्ण काळात सचिन मोटे सर, गोस्वामी सर, प्रसाद, समीर दादा या लोकांनी मला प्रचंड साथ दिली. मी आई होणार असल्याने तो माझ्यासाठी खूपच वेगळा आनंद होता. जेवढं शक्य होईल तेवढं काम मी करेन असं मी सर्वांना सांगून ठेवलं होतं. या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी गरोदर असताना सातव्या महिन्यांपर्यंत हास्यजत्रेत काम केलं. त्या संपूर्ण प्रवासात या कलाकारांची खंबीर साथ लाभली.”

हेही वाचा : “चार लोकांमध्ये गेल्यावर…”, बिकिनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना प्रिया बापटचं स्पष्ट उत्तर; म्हणाली, “मराठी संस्कृती…”

“माझं बाळंतपण झालं आणि त्यानंतर मी पूर्ण सहा महिने ब्रेक घेतला. त्या ब्रेकनंतर मी जेव्हा हास्यजत्रेत पुन्हा आले तेव्हा माझ्या पदरात बाळ होतं, वजन वाढलेलं होतं, अंगावर सूज आली होती. त्यावेळी मी पुन्हा स्किट सादर करायला सुरूवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की, माझ्याकडून पूर्वीसारखं काम आता होत नाही. पुनरागमन केल्यावर प्रसाद आणि माझ्या एका स्किटदरम्यान खूप रडले. आधीसारखी एनर्जी नव्हती, शंभर टक्के देऊ शकत नाही या सगळ्या गोष्टी मला जाणवत होत्या. त्या क्षणाला मी खूप रडले. तेव्हा पुन्हा एकदा मोटे सर आले आणि त्यांनी माझी विचारपूस केली. त्यांनी मला खूप प्रेरणा दिली. तू फक्त दोन तास सरावासाठी ये…पूर्णवेळ रुद्राजला दे, तुला गोष्टी येत नाही, तू जाडी झाली आहेस, तुझा चेहरा मोठा झालाय असे कोणतेच नकारात्मक विचार करू नकोस…तुला जी मदत हवीये ती आम्ही सगळे तुला करू. त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे मी पुन्हा एकदा त्याच जोमाने काम करू लागले.” असं नम्रता संभेरावने सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame namrata sambherao talks about her first delivery and how co stars help her sva 00
Show comments