‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम केवळ देशभरातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे दत्तू मोरे, निखिल बने, ओंकार राऊत, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप असे बरेच कलाकार प्रसिद्धीझोतात आले. सुरुवातीपासून प्रचंड मेहनत करून या कलाकारांनी यशाचा हा मोठा टप्पा गाठला आहे. निखिल बने याने नुकतीच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या गप्पा मस्ती पॉडकास्टला उपस्थिती लावली होती. यावेळी त्याने हास्यजत्रेच्या सेटवरचा एक किस्सा सांगितला.

भार्गवीने निखिल बने आणि दत्तूला तुमच्याकडून कधी स्किटदरम्यान चुका झाल्या आहेत का? असा प्रश्न विचारला. यावर निखिल सांगतो, “आता आमच्यामध्ये फारसं कोणी चुकत नाही. पण, सुरुवातीच्या काळात आम्ही बऱ्याचदा चुकायचो. आमच्यामुळे अनेकदा स्किट थांबायचं. मी तर एकदा सलग ७ ते ८ वेळा चुकलो आणि ऑनस्टेज रडलो होतो.”

हेही वाचा : “दिल्लीनं दिलदारपणाचा कळस गाठला”, मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ यांची वर्णी, प्रवीण तरडे म्हणाले…

निखिल बने पुढे म्हणाला, “मला एक शब्दच येत नव्हता…तो शब्द कोणता हे मला आताही आठवत नाहीये. सराव करताना सुद्धा माझ्याकडून तिच चूक होत होती. मला बोलताना नेहमी असं वाटायचं आता मी इथे चुकणारच आहे. ती एक भीती माझ्या मनात निर्माण झाली होती. पहिल्यांदा चुकलो तेव्हा सगळे बोलले चल ठिके…पुन्हा संपूर्ण वाक्य बोलून चुकलो. तरी सगळ्यांनी सावरलं. तिसऱ्यांदा वाक्य बोललो तेव्हा सुद्धा तसंच झालं…त्यानंतर माझं असं झालं की, अरे मी लागोपाठ चुकतोच आहे.”

“सेटवर एकदम शांत वातावरण तयार झालं होतं. कारण, माझ्यामुळे ते स्किट सारखं थांबत होतं. पाणी वगैरे प्यायलो तरीही परत चौथ्यांदा चुकलो. मला खूप दडपण आलं होतं. मी शेवटी हातवर केले…कारण, तो शब्द मला बोलताच येईना. पुढे पाचव्यांदा चुकलो, मग सहाव्यांदा चुकलो आणि मी रडायलाच लागलो.” असं निखिल बनेने सांगितलं.

हेही वाचा : मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान! मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव, जाणून घ्या…

निखिल पुढे सांगतो, “मी रडायला लागल्यावर सगळंच शांत झालं होतं. सई मॅम उठून आल्या…त्यांनी पाण्याची बॉटल दिली. त्या म्हणाल्या पाणी पी…काही नाही होत. सगळेजण उठून आले, मी शांत झालो. पुन्हा टेक चालू झाला आणि मी परत चुकलो. मला बोलता येत नव्हता.. तो मराठीतच शब्द होता पण, आताही तो शब्द मला आठवत नाहीये. मी आठव्यांदा चुकलो तेव्हा सेटवर सगळ्यांनी आशा सोडून दिल्या होत्या…आणि मग मलाच कसंतरी वाटलं. त्यावेळी मनाशी ठरवलं होतं काही करून ते वाक्य पूर्ण बोलायचं. त्यानंतर एका दमात मी ते वाक्य बोललो आणि सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या.”