मराठी कलाविश्वातील बहुतांश कलाकार हे कोकणातील आहेत. गणपती उत्सव, शिमगोत्सव असो किंवा जत्रा हे सगळे कलाकार आवर्जुन आपल्या गावी पोहोचतात. कलाकारांप्रमाणे मुंबईतील बरेच चाकरमानी सुट्ट्यांमध्ये गावची वाट धरतात. उन्हाळ्याचे दोन महिने कोकण रेल्वेच्या गाड्यांना तुफान गर्दी असते. कलाकार म्हटले की, आलिशान किंवा खाजगी गाड्यांनी गावी जाणार असा समज अनेकांचा झालेला आहे. परंतु, छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता याला अपवाद ठरला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम आज घराघरांत लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलंय. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. यापैकी एक म्हणजेच निखिल बने. दरवर्षी सणउत्सवानिमित्त निखिल आपल्या गावी कोकणात जातो. त्याने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे.
हेही वाचा : ठरलं तर मग : अर्जुन-चैतन्यमध्ये दिलजमाई! अखेर साक्षीचा खोटेपणा होणार उघड, साखरपुडा मोडणार? पाहा नवीन प्रोमो…
निखिल बने चक्क दिवा-सावंतवाडी गाडीच्या गर्दीतून प्रवास करत चिपळूणला पोहोचला. एवढंच नव्हे तर चिपळूणवरून मूळ गावी जाण्यासाठी निखिलने लालपरी अर्थात एसटीने प्रवास केला. यानंतर त्याने व्हिडीओमध्ये त्याचं गावचं घर आणि कोकणातल्या निसर्गसौंदर्याची झलक नेटकऱ्यांना दाखवली. सध्या निखिलच्या या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; स्क्रीनशॉट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “आता थेट पोलीस…”
“खरा कोकणी माणूस”, “जमिनीवर पाय असलेला आमचा चिपळूणकर हिरो”, “भावा खूप मोठा हो”, “बने भाऊ तुम्ही किती साधे राहता”, “तुम्ही एवढे साधेपणाने राहणारे असाल, असं खरंच वाटलं नव्हतं”, “साधे सरळ सोपे जीवन” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी निखिलचं भरभरून कौतुक केलं आहे. तसेच यापुढे सुद्धा असेच व्हिडीओ शेअर करत जा, आम्हालाही तुझ्या गावी यायचंय अशी मागणी त्याच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडीओद्वारे केली आहे.