Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut : दरवर्षी २५ डिसेंबरला संपूर्ण जगभरात नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा बॉलीवूडसह काही मराठी सेलिब्रिटींनी सुद्धा ख्रिसमस पार्ट्यांचं आयोजन केल्याचं पाहायला मिळाल. तर, काही कलाकारांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ख्रिसमस सणाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, नाताळ सण सेलिब्रेट केल्यामुळे अनेक मराठी कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेल्या ओंकार राऊतला सुद्धा असाच काहीसा अनुभव आला. काही दिवसांपूर्वी हास्यजत्रेचे सगळे कलाकार परदेश दौऱ्यावर गेले होते. लंडनमधल्या मराठी प्रेक्षकांसाठी हास्यजत्रेचे काही प्रयोग आयोजित करण्यात आले होते. नोव्हेंबर महिन्यापासूनच परदेशात ख्रिसमस सेलिब्रेशनला सुरुवात होऊन सर्वत्र सजावट केली जाते. यादरम्यानचे काही फोटो ओंकार राऊतने आज ( २५ डिसेंबर ) इन्स्टाग्राम शेअर करत त्याच्या सर्व चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. यावर एका नेटकऱ्याने खोचक कमेंट केल्याचं पाहायला मिळालं. या युजरला अभिनेत्याने रोखठोक उत्तर दिलं आहे.
नेटकऱ्याला काय म्हणाला ओंकार राऊत?
ओंकार राऊतच्या ( Onkar Raut ) फोटोवर कमेंट करत एका नेटकऱ्याने “भावा, कधी आपल्या सणांचे फोटो टाकलेस का?” असा प्रश्न विचारला.
यावर अभिनेता उत्तर देत म्हणाला, “हो रे! मी जे सण साजरे करतो त्याचे फोटो कधी पोस्ट करतो कधी नाही! मुळात प्रत्येक सण हा आनंद पसरवतो. त्यामुळे हा सण आपला तो सण त्यांचा अशी घाणेरडी वृत्ती नको. लहानपणापासून मी गणपतीत मोदक खाल्ले आहेत, दिवाळीत फराळ, होळीला पुरणपोळी, ख्रिसमसला सांताकडून येणाऱ्या गिफ्ट्सची वाट बघितली आहे. ईदला माहिमला जाऊन मालपोहे खाल्ले आहेत, खूप प्रसन्नतेने गुढीपाडवा सुद्धा साजरा केलाय आणि त्याच उत्साहात ३१ डिसेंबर सुद्धा साजरा करतो!! म्हणून हे असले प्रश्न परत कोणालाही विचारू नकोस! Merry Christmas!! सांता तुला गिफ्ट म्हणून सुविचार देवो!!!”
हेही वाचा : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री झळकणार आता नव्या भूमिकेत, पोस्ट करत म्हणाली, “माझी नवी मालिका…”
दरम्यान, ओंकार राऊतचं ( Onkar Raut ) हे उत्तर प्रत्येकाला भावलं आहे. अभिनेता पृथ्वीक प्रतापने या कमेंटचा स्क्रिनशॉट आपल्या स्टोरीवर शेअर करत ‘करारा जबाब’ असं कॅप्शन देत आपल्या मित्राचं कौतुक केलं आहे.