नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणून नम्रता संभेरावला ओळखलं जातं. प्रेक्षकांमध्ये तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच नम्रता प्रमुख भूमिकेत असलेला ‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये तिच्यासह अभिनेत्री मुक्ता बर्वेने प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या सर्वत्र महाराष्ट्रभरात या चित्रपटाला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. परंतु, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी नम्रताला अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद खांडेकरने एक खास पत्र लिहिलं होतं. याची खास पोस्ट व फोटो नम्रताने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसाद त्याच्या पत्रात लिहितो, “महाराष्ट्राची लाडकी आणि टॅलेंटेड अभिनेत्री नमा! १ मे ला तुझ्या आयुष्यातील पहिला सुपरहिट सिनेमा ज्यात तू प्रमुख भूमिका करतेय असा ‘नाच गं घुमा’ प्रदर्शित होतोय. तू खूप वर्षे या क्षणाची वाट पाहिलीस आणि आज तो क्षण आला…आताचा हा संपूर्ण काळ जगून घे…यातील प्रत्येक क्षणाचा उपभोग घे. यापुढे अजून खूप सुपरहिट सिनेमे तुझ्या नावावर लागतील पण, पहिला चित्रपट तुझ्या कायम स्मरणात राहील. म्हणून १ मे पासून प्रत्येक क्षण साठवून ठेव आणि घरात अवार्ड्ससाठी जागा पण करून ठेव…खूप खूप शुभेच्छा तू सुपरस्टार आहेस.”

हेही वाचा : “राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण, दुसरीकडे माझं घर विकलं”, प्रसाद ओकने पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाला, “बँकेचे हप्ते, कर्ज…”

मोबाईलवर पाठवलेले मेसेज अनेकदा डिलीट होतात पण, कागद तसाच राहतो. त्यामुळे प्रसादने हे पत्र लिहून नम्रताला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, हे पत्र त्याने सिनेमा प्रदर्शित व्हायच्या एक दिवस आधी लिहिलं होतं. या पत्राबरोबर प्रसादने नम्रताला गिफ्ट म्हणून सुंदर असे कानातले दिले आहेत. ‘नमा’ नाव लिहिलेले हे कानातले खूपच सुंदर दिसत आहेत.

हेही वाचा : अनुष्का शर्माच्या वाढदिवशी विराट कोहलीची खास पोस्ट; पत्नीबद्दल म्हणाला, “माझ्या आयुष्यात तू नसतीस तर…”

नम्रताने ही खास पोस्ट शेअर करत प्रसादचे आभार मानले आहे. ती म्हणते, “सिनेमा प्रदर्शित व्हायच्या एक दिवस आधी तू हे पत्र लिहिलंस तू नेहमीच प्रोत्साहन देत आलायस. सिनेमा सगळीकडे हाऊसफुल्ल चाललाय. इतकं सुंदर सरप्राइज मेरा सच्चा दोस्त! गिफ्ट छान आहेच पण, हे पत्र लिहिलंस तू किती भारी आहेस रे पश्या!” यावर प्रसाद खांडेकर म्हणतो, “तुझ्या कामावर विश्वास होता म्हणून सिनेमा पहायच्या आधी तुला हे पत्र आणि गिफ्ट दिलं पण सिनेमा पाहिल्यावर हा विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरला ह्याच समाधान लाभलं…कमाल काम केलंयस नमा तू … All the best”

दरम्यान, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सध्या महाराष्ट्रभरात या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar praise namrata sambherao send beautiful gift and letter sva 00