‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. विनोदाचं अचूक टायमिंग साधत अभिनेत्री शिवाली परबने सुद्धा प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. सध्या अभिनेत्री एका गाण्यामुळे चर्चेत आली आहे.
शिवाली परबचं “हार्टबीट वाढणार हाय” हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. यानिमित्ताने अभिनेत्रीने नुकतीच ‘मीडिया टॉल्क मराठी’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. एखाद्या सहकलाकाराशी नाव जोडलं गेलंय का? याबद्दल सांगताना शिवाली म्हणाली, “मला आधी या गोष्टीची फार भीती वाटायची. आई-बाबा काय बोलतील असे विचार मनात यायचे. कारण, सोशल मीडियावर फक्त चाहते किंवा आई-बाबा नव्हे तर आपलं संपूर्ण कुटुंब, आपल्या पालकांचे मित्र-मैत्रिणी देखील असतात. अशावेळी आमच्या फोटोंवर अनेक कमेंट्स वगैरे येतात. असंच माझ्या आणि निमिषच्या बाबतीत झालं.”
हेही वाचा : संजय दत्तचा ‘वास्तव’ चित्रपट पाहून गौरव मोरेने ठरवलेली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “पावभाजीची गाडी किंवा…”
शिवाली पुढे म्हणाली, “आम्ही एका स्किटमध्ये काम केलं होतं मग, त्या चर्चा चालू झाल्या. खरंतर, मी आणि निमिष खूप आधीपासून मित्र आहोत. आम्ही एकत्र एकांकिका वगैरे केल्या आहेत. त्यामुळे आमच्यात एक छान बॉण्डिंग आहे. आमचं हेच बॉण्डिंग ऑनस्क्रीन खूप छान दिसतं. यामुळे आमच्या फोटोंवर कमेंट्स येतात, चर्चा होतात. पण, आम्ही खरंच फक्त खूप चांगले मित्र आहोत.”
“सर्वत्र चर्चा सुरू झाल्यावर, हे सगळं वाढल्यावर मी एकदा निमिषला माझ्या आई-वडिलांना भेटायला बोलावलं होतं. त्यांची भेट झाली मग, त्यांनाही कळालं हे फक्त चांगले मित्र-मैत्रिणी आहेत. त्या दिवसापासून मी ठरवलं आता लोकांना काहीही बोलूदे माझ्या आई-बाबांना माहितीये ना…हा माझा मित्र आहे हे माझ्यासाठी पुरे आहे. पण, आता हळुहळू या चर्चांची खूप सवय झालीये. कमेंट्स करणं ही प्रत्येकाची मतं असतात यावर आपण काहीच करू शकत नाही. यानंतर मी आणि निमिषने एकदा आगाऊपणा सुद्धा केला होता. आम्ही सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर केला होता आणि डेट विथ निब्बा वगैरे लिहिलं होतं. पुढे, दोन दिवस यावर चर्चा चालू होती. पण, माझ्या खऱ्या आयुष्यात काय चालूये याबद्दल खरी माहिती कोणालाच नाही. हे एक खूप चांगलंय.” असं शिवाली परबने सांगितलं.