‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अभिनेत्री वनिता खरात नावारुपाला आली. वनिताने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अलीकडेच हास्यजत्रेतील कलाकार वनिता खरात, समीर चौघुले, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने यांनी तरुण पिढीशी संवाद साधण्यासाठी रुईया महाविद्यालयात हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री वनिता खरातने तिच्या आयुष्यातील संघर्षाविषयी भाष्य केलं.
हेही वाचा : पहिल्या भेटीतच गौरी सावंत यांनी सुश्मिता सेनला विचारला होता ‘तो’ प्रश्न; म्हणाल्या, “तृतीयपंथी भूमिका…”
वनिता म्हणाली, “आयुष्यात संघर्ष हा कायम असतोच. कारण, हा कार्यक्रम संपल्यावर पुढे काम शोधण्यासाठी संघर्ष असेल फक्त तो आधीसारखा नसेल. तेव्हा वडापाव खायला सुद्धा पैसे नसायचे. सगळ्यांचे पैसे एकत्र करून आम्ही वडापाव खायचो. या झगमगत्या दुनियेत मी फिट होईन का? असं मला केव्हाचं वाटलं नव्हतं. कारण, तेव्हा अभिनेत्री किंवा मॉडेल्स म्हणजे खूप छान दिसणाऱ्या असाव्या असा एक समज होता. त्यात मी फिट बसेन का? अशी शंका कायम माझ्या मनात असायची. पण, हास्यजत्रेत आल्यानंतर माझा आत्मविश्वास खूप वाढला.”
हेही वाचा : Video : “कसा आहेस रे तू ?”, ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेसाठी प्रसाद ओकने शेअर केला खास व्हिडीओ
“हास्यजत्रेत मी वेगवेगळ्या प्रकारची पात्र साकारली…मी सुद्धा तेवढीच सुंदर दिसू शकते हा आत्मविश्वास मला हास्यजत्रेने दिला आहे. माझ्यासारख्या बऱ्याच मुलींना आपण तिथे फिट होणार नाही, दिसायला सुंदर नाही असं वाटत असतं. माझ्या आयुष्यात मला हा आत्मविश्वास सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांनी दिला की, तू सगळ्या भूमिका साकारू शकतेस. जेव्हा तू साडी नेसतेस तेव्हा तू सगळ्यात सुंदर दिसतेस असं त्यांनी मला सांगितलं होतं. आज मी लहान मुलींपासून ते ७० वर्षांच्या आजींची सगळ्या भूमिका करू शकते हे सगळं त्या दोघांमुळे शक्य झालंय.” असं वनिताने सांगितलं.
हेही वाचा : “मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्याइतकं…”, गश्मीर महाजनीने केलं प्रवीण तरडेंचं कौतुक
दरम्यान, वनिता खरात सध्या हास्यजत्रेच्या नव्या पर्वातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर तिने यावर्षी तिचा प्रियकर सुमीत लोंढेबरोबर लग्नगाठ बांधली. दोघेही सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत.