Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या विशेष प्रयोगांचं आयोजन परदेशातील विविध ठिकाणी केलं जातं. नुकतेच हे सगळे कलाकार अमेरिकेच्या दौऱ्यावर जाऊन आले. यापूर्वी हास्यजत्रेचे शो सिंगापूर, न्यूयॉर्क, दुबई अशा विविध ठिकाणी पार पडले आहेत. आता हे विनोदवीर लंडनमधील प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. विशेषत: लॉकडाऊनच्या काळात हा कार्यक्रम घराघरांत पाहिला जायचा. प्रियदर्शिनी, शिवाली, गौरव मोरे, रसिका वेंगुर्लेकर, दत्तू मोरे, वनिता खरात अशा अनेक नवोदित कलाकारांना या कार्यक्रमामुळे लोकप्रियता मिळाली. आता नुकतेच या कार्यक्रमातील जवळपास सगळेच विनोदवीर लंडनला निघाले आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे शो लंडनमध्ये येत्या २३ आणि २४ नोव्हेंबरला होणार आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांना लाइव्ह, बेक आणि शॉ थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. यासाठी बुकिंग आधीच सुरू करण्यात आलं होतं. लंडनला निघण्यापूर्वीचा मुंबई विमानतळावरचा या सगळ्या कलाकारांचा एक फोटो सध्या चर्चेत आला आहे.
प्रसाद खांडेकरने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा लाइव्ह इन लंडन’ असं कॅप्शन देत सर्व कलाकारांबरोबरचा एक खास सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर, आणखी एका फोटोला अभिनेत्याने ‘चलो लंडन’ असं कॅप्शन दिलं आहे. प्रसादसह, नम्रता संभेराव, प्रभाकर मोरे, सचिन गोस्वामी, वनिता खरात, अरुण कदम, समीर चौघुले, चेतना भट, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत, शिवाली परब, प्रथमेश शिवलकर असे सगळे दमदार कलाकार या फोटोमध्ये एकत्र दिसत आहेत.
हेही वाचा : रश्मिका मंदानाशी असणाऱ्या अफेअरच्या चर्चेवर विजय देवरकोंडाने सोडलं मौन; म्हणाला, “मी माझ्या सहकलाकाराला…”
एअरपोर्टवर काही चाहत्यांची भेट झाल्याचे फोटो देखील प्रसादने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. आता हे सगळे विनोदवीर लंडनमध्ये जाऊन काय-काय धमाल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय हास्यजत्रेचं नवीन पर्व येत्या २ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सगळे प्रेक्षक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रिक ( Maharashtrachi Hasya Jatra ) हा नवा सीझन पाहण्यासाठी उत्सुक आहेत.