Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम केवळ देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकारांना घराघरांत प्रसिद्धी मिळाली. या शोमधले सगळेच हास्यवीर दरवेळी नवनवीन विषयांवर आधारित स्किट सादर करून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात. हास्यजत्रेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागात प्रेक्षकांना एका लोकप्रिय अभिनेत्री झलक पाहायला मिळाली. ही अभिनेत्री कोण आहे जाणून घेऊयात…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा नवाकोरा सीझन ‘कॉमेडीची हॅटट्रीक’ अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात प्रेक्षकांना एका लोकप्रिय अभिनेत्रीची झलक पाहायला मिळाली. ही अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासार. तिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
‘कमला’ या मालिकेतून अश्विनीने तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. ‘कट्टी-बट्टी’, ‘मोलकरीण बाई – मोठी तिची सावली’, ‘सावित्रीज्योती’ अशा मालिकांमध्ये तिने यापूर्वी काम केलेलं आहे. याशिवाय अश्विनी अनेक व्यावसायिक नाटकं, शॉर्ट फिल्म्समध्ये सुद्धा झळकली आहे. आता नुकतीच अश्विनीची झलक प्रेक्षकांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये पाहायला मिळाली. याचा व्हिडीओ ‘सोनी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
हास्यजत्रेच्या सेटवरचा फोटो शेअर करत आपल्या भूमिकेविषयी सांगताना अश्विनी म्हणाली, “कुमुदिनी सुखात्मे from हास्यजत्रा! तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद! मला सांभाळून घेतल्याबद्दल आणि मला कायम चीअर केल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. समीर चौघुले दादा, शिवाली परब आणि ईशा डे तुम्हाला खूप थँक्यू”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये अश्विनीला पाहून नेटकऱ्यांनी या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “अश्विनी कासार हास्यजत्रेची कायमची सदस्य म्हणून हवी आहे” अशा कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत. दरम्यान, हास्यजत्रेचा हा नवीन सीझन सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता ‘सोनी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केला जातो.