‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. या सगळ्या कलाकारांना प्रेक्षकांना लवकरच लाइव्ह पाहण्याची संधी मिळणार आहे. अभिनेत्री नम्रता संभेरावने यासंदर्भात पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.
हास्यजत्रेच्या कलाकारांचं लाइव्ह स्किट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. काही महिन्यांपूर्वी हे विनोदवीर परदेशातील आपल्या चाहत्यांना हसवण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या लाइव्ह शोचं आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे. २१ ऑक्टोबरला पुण्यातील कर्वे नगर येथील पंडित फार्म्समध्ये हास्यजत्रेच्या कलाकारांना लाइव्ह परफॉर्म करताना पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
हेही वाचा : ‘जवान’मध्ये थलपती विजयचा कॅमिओ का नव्हता?, दिग्दर्शक अॅटलीने सांगितलं खरं कारण; म्हणाला, “दुसरा भाग…”
ज्या प्रेक्षकांना या लाइव्ह कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे, त्यांनी ‘बुक माय शो’ अॅपवरून बुकिंग करावं अशी विनंती हास्यजत्रेच्या कलाकारांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत केली आहे. नम्रता संभेराव, प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, ओंकार राऊत, पृथ्वीक प्रताप, समीर चौघुले, शिवाली परब, प्रसाद खांडेकर या सगळ्या कलाकारांना लाइव्ह पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
हेही वाचा : अखेर रिंकू राजगुरुने स्पष्ट केलं इन्स्टाग्राम पोस्ट गायब होण्यामागचं कारण, म्हणाली, “आता सगळं…”
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’-सहकुटुंब हसूया! या नव्या पर्वाची सुरुवात १४ ऑगस्टपासून झाली होती. उत्तम अभिनय, विनोदाचं अचूक टायमिंग यामुळे या कार्यक्रमातील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.