Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. गेल्या सहा वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहेत. आजही या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार घराघरात पोहोचले आहेत. कलाकारांच्या विनोद शैलीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाने सिनेसृष्टीला बरेच नवोदित कलाकार दिले; जे आता मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही उत्कृष्ट काम करताना दिसत आहेत. अशा या लोकप्रिय कार्यक्रमाने आता सातव्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यानिमित्ताने कार्यक्रमातील काही कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasyajatra ) कार्यक्रमाचे लेखन सचिन गोस्वामी यांनी सहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने फेसबुकवर खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी कार्यक्रमाशी निगडीत असलेल्या प्रत्येकाचे आभार व्यक्त केले आहेत. सचिन गोस्वामी यांनी लिहिलं आहे, “मित्रहो हास्य जत्रेला सहा वर्ष पूर्ण झाली आणि आता आम्ही सातव्या वर्षात पदार्पण केलंय हा प्रवास साडे आठशे भागानंतरही सुरुच आहे. हा हास्य प्रवास संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमाचे फलित आहे. मित्रहो, २०१८ या वर्षात ‘सोनी मराठी’ या वाहिनीची सुरुवात झाली आणि या वाहिनीवर एक विनोदाला वाहिलेला कार्यक्रम असावा असा विचार ‘सोनी मराठी’चे सर्वेसर्वा श्री अजय भाळवणकर आणि अमित फाळके यांच्या मनात आला. अमित फाळके यांनी सचिन मोटे आणि माझ्याशी संपर्क केला. तिथं हास्यजत्रा आकाराला आली.”
पुढे सचिन यांनी लिहिलं, “संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे तर जगभरातील मराठी माणसाच्या पसंतीस उतरलेला हा कार्यक्रम २०० रंगकर्मी यांनी मिळून तयार केलेला कार्यक्रम आहे. पाहिले १००भाग सहनिर्मिती सहयोग देणारे फ्रेम्स ही निर्मिती संस्था, या हास्यमोहिमेत मोलाचे योगदान देणारे आमचे लेखक, सचिन मोटे, अमोल पाटील, प्रसाद खांडेकर, समीर चौघुले, अभिजित पवार, ऋषिकांत राउत, श्रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर, विनायक पुरुषोत्तम, आमचे सर्व तंत्रज्ञ, कॅमेरा टीमचे प्रमुख शैलेंद्र राऊत आणि टीम, प्रकाश योजना पुरवणारे उल्हासजी आणि टीम. आमचे रंगभूषाकार वर्दमजी आणि टीम. वेशभुषा सांभाळणारे मेघा मोटे आणि सोनाली खोसे त्यांची टीम. कॅमेरा ईक्वीपमेंट पुरवणारे ब्रॉडकास्ट आणि टीम, ध्वनी संयोजन करणारे जगदीश दादा पाटील आणि टीम, आमचे तंत्र दिग्दर्शक वैभव निवाते, आमचे आर्टडायरेक्टर ऋषी आणि टीम. निर्मिती प्रमुख श्री सुनिल डांगे आणि टीम. तंत्र दिग्दर्शक आणि कार्यकारी निर्माता दशरथ सिरसट. प्रियांका हांडे, दत्तू मोरे, विराज जगताप, मृणाल मराठे, हरीश कस्पटे हे सहाय्यक दिग्दर्शक टीम. सोनी मराठीचे कार्यकारी निर्माते गणेश सागडे, सिद्धगुरू जुवेकर,अमित दीक्षित. सोनी मराठीची मार्केटिंग टीम, प्रमोटीम, तंत्रज्ञ, अविनाश वंजारे आणि कमर्शियल टीम , सोनी मराठी ची S&P ची टीम आणि आजवर ज्यांनी ज्यांनी या हास्य प्रवासात साथ दिली ते आजी माजी सर्व कलावंत, सई आणि प्रसाद ओक, प्राजक्ता माळी आणि नेहमी आपुलकीने मदतीस येणारे सोनाली कुलकर्णी, सिध्दार्थ जाधव, या सर्व घटकांच्या अविरत कष्टाचा गुलकंद म्हणजे हास्य जत्रा ( Maharashtrachi Hasyajatra ) …अजय भाळवणकर सर, आणि श्री अमित फाळके यांनी आम्हाला या प्रवासासाठी सहयोगी केलं याबदल त्यांचे आणि सोनी मराठीचे खूप आभार …रसिक हो आजवर जशी प्रेमाने, आपुलकीने प्रेम केलं तसंच करत राहा..आपले खूप आभार…”
हेही वाचा – अश्विनी एकबोटेंचा मुलगा शुभंकर झळकणार विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटात, टीझर शेअर करत म्हणाला…
सहा वर्षे अभिमानाची, सुखाची, भरभराटीची – नम्रता संभेराव
तसंच अभिनेत्री नम्रता संभेराव हिने देखील खास पोस्ट लिहिली. तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasyajatra ) मधील कलाकारांबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं, “महाराष्ट्राची हास्यजत्रा मोठा प्रवास ८५० भागांचा….सहा वर्षे अभिमानाची, सुखाची, भरभराटीची ‘सोनी मराठी’बरोबरच्या नात्याची आणि हा प्रवास प्रेक्षकांशिवाय शक्य नव्हता. तुमचं अतोनात प्रेम जिव्हाळा आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हीच आमच्या कामाची पावती, हास्यजत्रेमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलोय खूप भारी वाटतंय. तुमचं आमच्यावरच प्रेम असंच राहू द्या कायम.”
या प्रवासात जगभरातील प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम – प्रसाद खांडेकर
अभिनेता प्रसाद खांडेकरने लिहिलं की, “१९ ऑगस्ट २०१८ रोजी ‘सोनी मराठी’ आणि हास्य जत्रेला सुरुवात झाली..सहा वर्षे झाली हास्य जत्रा रसिकांचे मनोरंजन करत आहे..या प्रवासात जगभरातील प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं.. एकूण ८५० भाग प्रदर्शित झाले आणि हा प्रवास सुरू आहे…सर्व हितचिंतक आणि प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार…सोनी मराठीचे खूप खूप आभार..”
सहा वर्षे रसिकांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची… – समीर चौघुले
अभिनेते समीर चौघुले यांनी देखील सुंदर पोस्ट लिहिली. ते म्हणाले, “आज हास्यजत्रा ( Maharashtrachi Hasyajatra ) सुरू होऊन सहा वर्षे झाली…८५० भाग पूर्ण झाले…सहा वर्षे रसिकांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची, आमच्या अथक आणि प्रामाणिक मेहनतीची…रसिक मायबाप आणि आमच्यात सुरू झालेल्या अतूट नात्याची…’सोनी मराठी’ वाहिनीने दाखवलेल्या विश्वासाची, गोस्वामी सर आणि मोटे सरांनी केलेल्या मार्गदर्शनाची…सहा वर्षे खूप काही शिकण्याची, धडपडण्याची, ठेच लागण्याची आणि पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारण्याची…सहा वर्षे नैराशेत गेलेल्या अनेकांना कळत नकळतपणे बाहेर काढण्याची आणि त्यांचे हसणारे चेहरे बघून भरून पावण्याची…सहा वर्षे सामान्यांना बसणारे धक्के चिडचिड सहन करण्याची ताकद मिळवून देण्याची…सहा वर्षे “अजून ही हवेत न उडता खूप काही करायचं आहे…लोकांना आणखीन हसवून त्यांना आनंद मिळवून द्यायचा आहे” हे सातत्याने वाटण्याची…ही सहा वर्षे आनंदाची, अभिमानाची, समाधानाची….”
हेही वाचा – ‘कलर्स मराठी’ची ‘ही’ लोकप्रिय मालिका गाशा गुंडाळणार, दोन महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या आली होती भेटीस
पुढे आभार मानत समीर चौघुले म्हणाले, “थँक्यू सो मच सोनी मराठी, अमित फाळके, सचिन गोस्वामी, सचिन मोटे…आमचे सर्व लेखक आणि सर्व जगात भारी अतरंगी सहकलाकार…हास्यमेव जयते…”