‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमात दिसणारे कलाकार कायमच चर्चेत असतात. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने काही महिन्यांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला. त्यानंतर आता या कार्यक्रमातील ओंकार भोजने आणि पंढरीनाथ कांबळे यांनीही या कार्यक्रमातून एक्झिट घेतली. यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला. नुकतंच यावर कार्यक्रमाच्या दिग्दर्शकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील समीर चौगुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, नम्रता संभेराव, ओंकार भोजने यासारखे अनेक विनोदवीरांचे निखळ मनोरंजन करत असतात. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारा शो म्हणून त्याला ओळखले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर कार्यक्रम सोडताना दिसत आहे.
आणखी वाचा : “कोणीतरी आपल्याला जा म्हणण्यापेक्षा…” पॅडी कांबळेने सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागचे कारण
यातील ओंकार भोजने आणि पंढरीनाथ कांबळी यांनी झी मराठी वाहिनीवरील ‘फू बाई फू’ साठी कार्यक्रमासाठी मालिकेतून एक्झिट घेतली आहे. त्यावर नुकतंच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुकतंच ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’शी बोलताना त्यांनी याबद्दल भाष्य केले.
“अनेक कलाकार हे एकत्र येऊन कलाकृती घडवतात. त्या कलाकृतीमुळे ते स्वतः मोठे होतात आणि कलाकृतीदेखील मोठी होते. या सगळ्यात कलाकारांचं त्या कलाकृतीबरोबरच नातं महत्त्वाचं असतं. हे नातं कसं जपायचं हे ज्यानं-त्यानं ठरवायचं असतं. कोणाच्या असण्यानं किंवा त्याच्या जाण्यानं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या त्या कलाकृतीला काहीही फरक पडत नाही. या कलाकृतीची बांधिलकी प्रेक्षकांबरोबर असते. प्रेक्षकांना ती कलाकृती आवडल्यास तिला ते डोक्यावर घेतात. जर पसंत पडली नाही तर ते मनोरंजनासाठी दुसऱ्या कलाकृतीकडे जातात”, असे दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले.
आणखी वाचा : विशाखा सुभेदारपाठोपाठ आणखी एका विनोदवीराची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’मधून एक्झिट, चर्चांना उधाण
दरम्यान ओंकार भोजने आणि पंढरीनाथ कांबळे हे कलाकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून एक्झिट घेणार असल्याचे कळताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी त्याला तो चुकीचा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा फार चांगला कॉमेडी शो आहे. त्यामुळे तू तो सोडू नकोस, अशी विनंतीही त्यांना त्याचे चाहते करताना दिसत आहे.