‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विनोदवीर-अभिनेते प्रभाकर मोरे यांनी आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे. प्रभाकर मोरे यांनी मनगटावर घड्याळ बांधत राष्ट्रवादीत प्रवेश केला. विनोदी कार्यक्रमात खळखळून हसवणारे अभिनेते अशी त्यांची ओळख सांगितली जाते. ते समाजकार्यात चांगलेच सक्रीय आहेत. काही दिवसांपासून ते राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आता त्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे.
प्रभाकर मोरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अजित पवारांनी प्रभाकर मोरे यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. यावेळी त्यांना कोकण विभागीय सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. अजित पवारांनी पत्रकार परिषेदेत याबद्दलची घोषणा केली.
आणखी वाचा : “माझी एवढीच इच्छा…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले थेट वक्तव्य
यावेळी प्रभाकर मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “कलाकारांच्या व्यथा मांडण्यासाठी आणि कोकणातील कला संस्कृतीत काही अडचणी आहेत. त्यामध्ये मदत करण्यासाठी, व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा कलाकारांवर विशेष प्रेम आहे. मला सर्वसामान्य कलाकारांसाठी काही तरी करण्याची इच्छा आहे. मला चांगले काम करायचे आहे. अजित पवार यांच्या स्वभावामुळे मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे.”
दरम्यान प्रभाकर मोरे यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमात आपल्या कोकणी शैलीतील संवादांनी आणि विनोदांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ते मूळचे रत्नागिरीतील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. प्रभाकर मोरे यांनी सुप्रसिद्ध निर्माते आणि लेखक संतोष पवार यांच्या नाटकांतून रंगभूमीवर पदार्पण केले होते. त्यांनी आतापर्यंत अनेक नाटकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.