आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटाचे कथानक शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा या भोवती फिरताना पाहायला मिळाले. नुकतंच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अभिनेता पृथ्वीक प्रतापने एक पोस्ट शेअर केली आहे.
पृथ्वीक प्रताप हा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. नुकतंच त्याने परेश मोकाशी लिखित ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट पाहिला. याबद्दल त्याने लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : Video : “तुम्हाला रील बनवण्याचे पैसे दिले नाही” प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर वैतागला दिग्दर्शक, कारण…
पृथ्वीक प्रतापची पोस्ट
‘आत्मपॅम्फ्लेट’, तर ‘भावांनो’, जगातल्या अनेक धर्मग्रंथांनी आपल्याला ‘शांततेची, अहिंसेची आणि एकतेची’ आवाहन कम सल्ला कम शिकवण दिलेली आहेच. पण सांगितलेलं, लिहून ठेवलेलं आपण जसच्या तसं एकदम चांगल्यापद्धतीने फॉलो केलं तर साला आपण ‘बुद्धीजीवी मनुष्य प्राणी’ कसले? मुळातच, फार पूर्वीपासून वर्गीकरण हा आपला अत्यंत आवडता छंद असल्यामुळे आपण सहसा शांत बसत नाही. मग फक्त होमो असून चालत नाही इरेक्टस कि सेपियन हे सुद्धा ठरवावं लागतं. अर्थात उत्क्रांती साठी ते महत्त्वाचेच. पण बऱ्याच वर्गीकरणात आपली प्रगती कमी आणि परागती जास्त होतेय हे मात्र ठरवून सुद्धा आपल्या लक्षात येत नाही.
तर ‘भावांनो’ सांगायचा मुद्दा असा कि, विज्ञानानुसार मानवी मेंदू साधारण १८ महिन्यांनी पूर्ण रूप धारण करतो त्या नंतर कुठल्याही एक्सट्रा न्यूरॉन्स किंवा सेल्स ची त्यात भर पडत नाही. म्हणजे मेंदू तयार व्हायला सुरुवातीचे दीड वर्षे आणि ‘maturity’ यायला साधारण २५ वर्षे, असं हे एकूण गणित आहे. पण साला सगळी गंमत इथेच आहे. दीड वर्षात मेंदू ने पूर्ण रूप धारण केल्यानंतर पुढच्या २५ वर्षात ‘समज’ येण्याआधी ‘समाज’ येतो.
आणि हा समाज आपल्या आयुष्यातले शिशु, बालक, कुमार, किशोर, तरुण, प्रौढ, वृद्ध हे टप्पे असे काय हेलकावून काढतो कि जगातल्या अनेक धर्मग्रंथांनी आपल्याला दिलेली ‘शांततेची, अहिंसेची आणि एकतेची’ शिकवण आपण क्षणार्धात विसरून जातो. आणि पुन्हा खेळ सुरु होतो वर्गीकरणाचा (मेंढूरपाक विशेषतः) असो, तर ‘भावांनो’ असं म्हणतात कि कला हि फक्त मनोरंजन करणारी नव्हे तर प्रबोधन करणारी सुद्धा हवी. हे वाक्यच मुळात आत्मपॅम्फ्लेट या सिनेमासाठी तयार करण्यात आलंय असं माझं ठाम मत झालेलं आहे. भवतालच्या परिस्थितीचा आरसा दाखवण्यासाठी ‘आशिष बेंडे’ या कारागिराने आख्खाच्या अख्खा ‘शिशमहाल’ च बांधलाय. आणि त्यात प्रत्येकाला प्रत्येकाची ‘डागाळलेली’ प्रतिमा ‘स्पष्ट’ दिसावी यासाठी ‘परेश मोकाशी’ यांनी ‘शीशमहालातील’ काचा आधीच इतक्या चकाकदार आणि स्वच्छ करून ठेवल्या आहेत कि आहाहा!
सत्यजित शोभा श्रीराम यांनी केललं छायाचित्रण आणि बबन अडागळे यांनी केलेलं कलादिग्दर्शन या सुद्धा सिनेमाच्या जमेच्या बाजू आहेत. ‘भावांनो’ सिनेमातील काळ जुना असला तरी विषय समकालीन आहे. आणि तो पोहचवण्यासाठी जी निरागसता हवी ती लहान मुलांपेक्षा जास्त कोणाकडे असणार?
त्यामुळे एका क्युट लव्ह स्टोरी च्या आडून बुद्धीने पांगळ्या झालेल्या समाजाला लेखक दिग्दर्शक काही टप्प्यांमध्ये योग्य तो पोलियो चा डोस देत राहतात. खरंतर बोलायला लिहायला आणखी खूप काही आहे पण फक्त बोलून, ऐकून, वाचून हा सिनेमा कळणार नाही तो खरतर अनुभवावा लागेल. दुर्दैवाने याचे फार कमी शो लागलेत त्यामुळे सिनेमा थिएटर मधून उतरण्या आधी तुम्ही थिएटर ला जाऊन हा सिनेमा नक्की पहा. त्यात हि ९०’s kids नी तर जरूर पहा.
सिनेमागृहात खळखळून हसवणारा सिनेमा आपण घरी पोहचेपर्यंत मनावर गारुड घालतो आणि विचार करायला भाग पाडतो. आणि एक Positive End आपल्या विचारांची दिशाच बदलून टाकतो आणि सभोवतालची नकारात्मकता संपवून टाकतो. ‘भावांनो’ हे ‘आत्मपॅम्फ्लेट’ज्यांच्या विवेकाची दारं बंद आहेत त्यांच्या घरी तर पोहचवलंच पाहिजे. कदाचित एखाद्या धर्मग्रंथातली ‘शांततेची, अहिंसेची आणि एकतेची’ शिकवण जी आपल्याला अजून कळत नाहीये, ती हे छोटसं पॅम्फ्लेट… ‘आत्मपॅम्फ्लेट’ समजावून जाईल. ( मुसोलिनी आणि हिटलर यांच्या फोटोचा इतका बेस्ट वापर जगात कुठे होऊ शकत नाही.), असे पृथ्वीक प्रतापने म्हटले आहे.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”
दरम्यान पृथ्वीकच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे यांनी केले आहे. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे.