‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकार मंडळी नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमातील निखिल साने, मंदार मांडवकर आणि सिद्धेश नागवेकर यांचं नवं गाणं प्रदर्शित झालं होतं; जे सध्या खूप चर्चेत आहे. ‘पोरं बदनाम’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर ८ तासांत १ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. याच सुपरहिट गाण्यावर ‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अभिनेत्यांनी भन्नाट डान्स केला आहे.
अभिनेता निखिल बनने हा भन्नाट डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निखिलसह पृथ्वीक प्रताप, रोहित माने, मंदार मांडवकर, श्रमेश बेटकर दिसत आहे. हे पाच जण ‘पोरं बदनाम’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहेत. हास्यजत्रामधील या अवलीयांचा भन्नाट डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला असून अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
दरम्यान, सुप्रसिद्ध गायक चैतन्य देवढेने त्याच्या सुरेल आवाजात ‘पोरं बदनाम’ गाणं गायलं आहे. हे गाणं शुभम प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालं असून या गाण्याची निर्मिती पायल गणेश कदम आणि गणेश दिनकर कदम यांनी केली आहे. तर सचिन आंबात यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. तसंच गाण्याचे बोल अनिरूद्ध निमकर याने लिहिले असून त्यानेच या गाण्याला संगीत दिलं आहे. हे गाणं नाशिकमध्ये चित्रीत करण्यात आलं होतं. या गाण्याची कथा तीन जिगरी मित्रांवर आधारित असून गाण्याचा शेवट प्रेक्षकांना जास्त आवडला आहे.
निर्माते गणेश कदम ‘पोरं बदनाम’ गाण्याच्या प्रोसेसविषयी म्हणाले, “शुभम प्रोडक्शन प्रस्तुत हॉरर कॉमेडी या जॉनरमधील असलेल्या ‘पौर्णिमेचा फेरा’ या वेब सीरिजला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही यावेळी काहीतरी वेगळं म्हणून गाणं करायचं ठरवलं. रोमँटिक गाणी सगळेच करतात तेव्हा आमच्या टीमनं ठरवलं की, यावेळी मैत्रीवर गाणं करूया. संगीतकार अनिरूद्ध निमकर याला आम्ही ही संकल्पना सुचवली आणि त्याने आम्हाला हे गाणं करून पाठवलं. आम्हाला ते गाणं फार आवडलं. गायक चैतन्यच्या सुरेल आवाजामुळे हे गाणं परिपूर्ण झालं. शिवाय निखिल बने, मंदार मांडवकर आणि सिद्धेश नागवेकरने तर या गाण्याला चार चांद लावले आहेत. सोशल मीडियावरील प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहता हे गाणं त्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे गाणं प्रदर्शित होताच १ मिलियन लोकांची पसंती मिळाली. त्यामुळे आमच्या सर्वांचा आनंद गगनात मावत नाही आहे.”