‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे तो घराघरात लोकप्रिय झाला. गेल्या काही दिवसांपासून गौरव हा ‘बॉईज ४’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने त्याच्या संघर्षाबद्दल सांगितले आहे.
गौरव मोरेने नुकतंच ‘महाराष्ट्र टाईम्स’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला तुला ऑडिशन देण्याचे व्यसन आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने फार सविस्तरपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : “#wowhemantsir…”, सिद्धार्थ चांदेकरच्या पोस्टवरील हॅशटॅगची सर्वत्र चर्चा, हेमंत ढोमे म्हणाला “काय गरज…”
“गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरातील फिल्टर पाड्यातील गौरव मोरे या नावाला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने ओळख मिळवून दिली. मला ऑडिशनचं व्यसन आहे. काही दिवसांपूर्वी मी इतक्या ऑडिशन दिल्या की सकाळी दहा-अकरा वाजता घर सोडायचो. त्यानंतर थेट रात्रीच घरी यायचो. मुंबईत अनेक लोक हे विविध ठिकाणांहून येत असतात. ते दिवस-रात्र मेहनत करतात.
मी पवईत राहतो. तिथून अंधेरी तासभर अंतरावर आहे. इथं राहूनही जर मी दिवसभर घरी बसलो, तर कलाकार म्हणून काय कमावलं, या विचारातून मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. मी ऑडिशनसाठी मराठी-हिंदी चित्रपट आणि नाटकांचे काही पॅच तयार करुन ठेवले आहेत”, असे गौरव मोरे म्हणाला.
आणखी वाचा : “प्राजक्ता माळीचं तिथे असणं…”, गौरव मोरेचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
“विजयकुमार यांच्याकडे अभिनय शिकायला जायचो. पुढे चित्रपटात छोटे-मोठ्या भूमिका मिळत गेल्या. मला चित्रपट करायला आवडतो. मला हास्यजत्रेत काम करायला संधी मिळाली, यासाठी मी खरंच आभारी आहे. मी काहीतरी पुण्यकर्म केलं असेल, त्याचं हे फळ आहे असं वाटतं. खरं तर ‘कोव्हिड’नंतर प्रेक्षक मोठ्या संख्येनं हा कार्यक्रम बघू लागले. या कार्यक्रमाचा पहिला भाग केला, तेव्हाच ‘संजू’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. यानंतर कार्यक्रमाचे भाग व्हायरल झाले. त्यानंतर गौरव मोरे, ओंकार भोजने, वनिता खरात, शिवाजी परब, निखिल बने ही नावं लोकांच्या लक्षात आली. त्यानतंर प्रेक्षकांनी जे प्रेम आणि आदर दिला, त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत”, असेही गौरव मोरेने सांगितले.