मुंबईतील वाहतूक कोंडी ही काही नवीन समस्या नाहीये. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाहतूक कोंडी होत असते. ठाण्यातील घोडबंदर रोडवर तर सध्या सतत वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. २४ मे पासून घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीकरण करून डांबरीकरण केलं जात आहे. त्यामुळे ठाणे-घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होत आहे. तसंच सध्या मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे घोडबंदरच्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अभिनेत्री सुप्रिया पाठारे, अभिजीत खांडकेकर असे अनेक कलाकार त्रस्त झाले होते. या कलाकारांनी सोशल मीडियावर त्यासंदर्भात पोस्टही केल्या होत्या. आता घोडबंदरच्या वाहतूक कोंडीत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री देखील अडकल्या होत्या.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अभिनेत्री नम्रता संभेराव, चेतना भट घोडबंदरच्या वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. याचा व्हिडीओ नम्रताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. अभिनेत्री घोडबंदरच्या वाहतूक कोंडीत अडकल्या असल्या तरी दोघी स्वतःचं मनोरंजन करताना दिसत होत्या.

हेही वाचा – Video: ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम ऋचा घांगरेकरने गायलं ‘ठरलं तर मग’ मालिकेचं शीर्षकगीत, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

नम्रताने या व्हिडीओवर लिहिलं होतं, “घोडबंदरच्या ट्रॅफिकमध्ये आम्ही आमचं मनोरंजन करतोय. एक वेगळंच frustration.” या व्हिडीओत, दोघीजणी रिक्षेत बसून स्वतःचं मनोरंजन स्वतः करताना दिसत आहेत.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/Namrata-Sambherao-1.mp4

हेही वाचा – Video: “माझं जे काही आहे ते तूच आहेस…”, जिनिलीया देशमुखने धाकट्या लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली…

दरम्यान, अभिनेत्री सुप्रिया पाठारे पाच तास घोडबंदरच्या वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्यांनी व्हिडीओ करून लोकांना आवाहन केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, “मी ठाण्यावरून सकाळी आठ वाजता निघाले आणि आता साडे बारा झालेत. तरी अजूनही मी मढला पोहोचलेली नाही. प्रवासात मला पाच तास होऊन गेलेले आहेत. घोडबंदर रोड पूर्णपणे जाम आहे. एक-एक तास गाड्या एका जागी थांबवून ठेवत आहेत आणि मुलूंड-ऐरोलीच्या ब्रीजच्या इथे कुठेतरी कंटेनर पलटी झालाय म्हणून तिथेही वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे तुमचं काम महत्त्वाचं नसेल तर प्लीज घराबाहेर पडू नका कारण खाण्या-पिण्याचे खूप हाल होतायत आणि दुसरी गोष्ट नाटकवाल्यांसाठी त्यांचा प्रयोग असेल चार किंवा साडे चारला तर त्यांनी प्लीज वेळेत निघा. कारण खूप वाहतूक कोंडी आहे सगळीकडून तर तुम्ही अडकायला नको म्हणून…धन्यवाद.”