‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून अभिनेत्री नम्रता संभेराव कायमच चर्चेत असते. नम्रता संभेरावला हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. आज तिच्या विनोदी शैलीचे लाखो चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये नम्रता साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवतं. नुकतंच नम्रता संभेराव ही ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेला गेली आहे. त्याच निमित्ताने नम्रताने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री विशाखा सुभेदार निर्मित ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत होणार आहेत. हे नाटक मातृत्वाच्या संवेदनशील विषयावर आधारित आहे. या नाटकात प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि पंढरीनाथ कांबळे हे कलाकार झळकताना पाहायला मिळत आहेत. सध्या ही संपूर्ण टीम अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
या निमित्ताने नम्रता संभेरावने एक पोस्ट शेअर केली आहे. नम्रताने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात या नाटकाची संपूर्ण टीम आणि त्यांचे कुटुंब पाहायला मिळत आहे. यावेळी नम्रता ही भावूक झाली आहे.
“निघालो साता समुद्रापलीकडे फॅमिली पासून दूर, महिनाभर लेकरापासून लांब चाललेय जड पावलांनी निरोप घेताना ऊर भरून आला होता. पण हरकत नाही, नाटकाचा अमेरिका दौरा यशस्वीरीत्या पार करून येऊच लवकर तूर्तास बाय बाय”, असे कॅप्शन नम्रताने केले आहे.
आणखी वाचा : “एकदा तो शिक्का पडला की…” पुन्हा हिंदी चित्रपटात काम न करण्याबद्दल वनिता खरातने दिले स्पष्टीकरण
दरम्यान ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकातून आई होण्याचा संवेदनशील विषय अगदी विनोदी पद्धतीने मांडण्यात येत आहे. आईपण हे महान आहेच, पण हे सुख अनुभवण्यासाठी थोडा वेळ लागत असेल तर तो प्रवासही त्या आई होणाऱ्या स्त्रीसाठी सुखद असायला हवा, हलकाफुलका असायला हवा. याच भावनेतून हे नाटक रंगमंचावर साकारण्यात आलं.