छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री शिवाली परब. शिवालीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. कल्याणची चुलबुली या नावानेही शिवालीला ओळखले जाते.
हेही वाचा-
शिवाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. निरनिराळे व्हिडीओ, फोटो पोस्ट करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान, तिने नुकताच बहिणीच्या हळदीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती भन्नाट डान्स करताना दिसत आहे. एवढेच नाही, तर त्या व्हिडीओमध्ये तिच्या वडिलांचाही वेगळा अंदाज चाहत्यांना बघायला मिळत आहे.
लवकरच शिवालीची बहीण लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाच्या विधींना सुरुवातही झाली आहे. नुकताच शिवालीच्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम दणक्यात पार पडला. यावेळी शिवालीबरोबर तिची बहीण आणि तिच्या वडिलांचा उत्साह बघायला मिळाला. या कार्यक्रमात शिवालीबरोबर तिच्या बहिणीप्रमाणेट वडिलांनीही भन्नाट डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाईक व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
शिवालीच्या या व्हिडीओवर हास्यजत्रेच्या कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री नम्रता संभेराव कमेंट करीत, ‘बाबा ऑन फायर’ असे लिहिले आहे. अभिनेता समीर चौघुले यांनी, ‘बाबा रॉक्स’, अशी कमेंट केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी शिवाली व तिच्या वडिलांच्या उत्साहाचे कौतुक केले आहे.