महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखले जाते. विशाखा सुभेदारने मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. एक उत्तम कॉमेडियन म्हणून तिला ओळखले जाते. मात्र तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास हा खूप खडतर होता. नुकतंच तिने याबद्दल खुलासा केला.
विशाखा सुभेदारने नुकतंच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला लोकलच्या प्रवासात वस्तू का विकल्या? याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर तिने प्रवासात वस्तू विकण्यामागची कारणही सांगितली.
आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य
“मी जेव्हा काम शोधत होते, त्यावेळी दिवसाला १०० रुपये प्रवासासाठी खर्च होणं ही फार मोठी गोष्ट होती. त्यामुळे मी येता-जाता आकाशवाणीतही काम करायचे. मी एका शाळेतही नोकरी केली. मी क्लासेसही घ्यायचे. याबरोबरच मी उल्हासनगरवरुन ड्रेस मटेरिअल घ्यायचे. ते आकाशवाणीत, ट्रेनमध्ये विकायचे. जगण्यासाठी काहीतरी पैसा हवा, त्यामुळे मग मी ते केलं”, असे विशाखा सुभेदारने सांगितले.
“त्यानंतर माझा नवरा जेव्हा त्याच्या क्षेत्रात व्यवस्थित काम करु लागला. त्याला काम मिळायला लागली. त्याच्या करिअरमध्ये एक स्थिरता आली, त्याला ठराविक रक्कम मिळायला लागल्यानंतर त्याने मला हे सर्व थांबव. २००३ ते २००४ या काळात त्याने मला तू तुझ्या करिअरकडे आता लक्ष दे, असे सांगितले.
आणखी वाचा : विशाखा सुभेदार यांनी सांगितला मालिका आणि कॉमेडी शोमधील कामाचा अनुभव, म्हणाल्या “प्रचंड स्पीड…”
मी ते करत असताना मला करिअरवर लक्ष केंद्रीत करता येत नव्हतं. त्यानंतर मग मी नाटकाच्या ऑडिशनला गेले. तिथून मला जाऊबाई जोरात हे नाटक मिळालं आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास सुरु झाला. हा प्रवास खरंतर खूप दगदगीचा होता. पण त्यातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. ट्रेनची गर्दी, सकाळी डबे घेऊन निघणं अशा अनेक गोष्टी होत्या. या प्रवासात मला माणसं कळायला लागली”, असेही विशाखा सुभेदारने म्हटले.
दरम्यान विशाखा सुभेदारने करिअरच्या सुरुवातीला अंबरनाथ ते दादर प्रवास केला. मनोरंजन क्षेत्रात येण्याआधी एका शाळेत शिक्षिकाही होत्या. त्याबरोबरच त्या आकाशवाणीतही काम करायच्या. त्या लोकल प्रवासात ड्रेस मटेरिअल, लिपस्टिक, नेलपेंटही विकण्याचे काम करायच्या. सध्या त्या ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकात व्यस्त आहेत. त्याबरोबरच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेतही त्या झळकताना दिसत आहेत.