‘फूबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अंशुमन विचारे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नेहमी आपल्या कुटुंबाबरोबर व्हिडीओ शेअर करत असतो. नुकताच अंशुमन विचारेची पत्नी पल्लवी विचारेने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एका दुकानात अभिनेत्याला मिळालेल्या वाईट वागणुकीविषयी पल्लवी विचारेने सांगितलं आहे.
“जर मालकाला दुकान चालवण्याची थोडीशी आवड असेल तर कृपया तुमच्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्या,” असं कॅप्शन लिहित अंशुमन विचारेची पत्नी पल्लवीने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून पल्लवीने घडलेली संपूर्ण घटना सांगितली आहे. तसंच चाहत्यांना या दुकानात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
या व्हिडीओत पल्लवी विचारे म्हणाली, “हे शॉप आहे. गुलाबी टी-शर्टवाला दुकानाचा मॅनेजर आहे. आम्ही याचा इन्स्टाग्रामवरचा रील व्हिडीओ बघून इथे आलो होतो. ठाण्यातील या दुकानात ब्रँडेड शूज, ७० टक्के सवलत असं काही नाहीये. अत्यंत वाईट वागणूक मिळते. इथे काम करणाऱ्या मुलांना ग्राहकाशी बोलण्याची पद्धत नाहीये. गुलाबी टी-शर्टवाल्याला खालून वेअर हाउसमधून शूज आणून द्यावे लागले म्हणून हा अंशूला अत्यंत वाईट पद्धतीने बोलला की, पहिलं तुम्हाला सांगता येत नाही का? मला खालून आणावे लागले ना. मग मी सुनावलं, तुझं हे काम आहे ना. तू सर्व्हिस सेक्टरमध्ये कामाला आहेस. त्याच्यामध्ये तुला इतका त्रास होण्यासारखं काही नाहीये. पण आम्ही खरेदी केली नाही, म्हणून त्याला त्रास आहे.”
पुढे पल्लवी विचारे म्हणाली, “अजिबात इथे जाऊ नका. खूप वाईट वागणूक मिळते. त्यापेक्षा दोन पैसे जास्त देऊन मला ब्रँडेड शॉपमध्ये गेलेलं परवडेल. पण, ग्राहकांना अशी वागणूक देते असतील तर इथे जाण्याचा काही फायदा नाहीये. इथे काहीही स्वस्त नाहीये. महागचं आहे. ५ ते ६ हजारांपासून शूजची किंमत सुरू होते.”
दरम्यान, अंशुमन विचारेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याचं ‘पाहिले न मी तुला’ हे नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या नाटकात अंशुमनसह सुवेधा देसाई, हेमंत पाटील पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अंशुमन ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये झळकला होता.