आपल्या विनोदी शैलीने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे अरुण कदम. लाडका दादूस म्हणून त्यांना अधिक ओळखलं जातं. गेल्या कित्येक वर्षांपासून अरुण कदम विविध चित्रपट आणि लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहेत. अरुण कदम जितके त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात, तितकेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्या अरुण कदम यांचा नातवाबरोबरच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
२०२३ मध्ये अरुण कदम आजोबा झाले. त्यांची लेक सुकन्याने १९ ऑगस्ट २०२३ला एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये अरुण कदम यांच्या नातवाच मोठ्या थाटामाटात नामकरण सोहळा झाला होता. अथांग असं त्याचं नाव आहे. अथांग आता दीड वर्षांचा झाला आहे. याच दीड वर्षांच्या चिमुकल्या नातवाला अरुण कदम यांनी राणीच्या बागेची सफर घडवली. याचा व्हिडीओ सुकन्याने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
सुकन्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अरुण कदम नातू अथांगबरोबर राणीची बाग फिरताना दिसत आहेत. टोक्यावर टोपी घालून दोघं राणी बागेची सफर करत आहेत. यावेळी दोघांबरोबर सुकन्या आणि अरुण कदम यांची पत्नी वैशाली कदम पाहायला मिळत आहेत. अरुण कदम अथांगला पेंग्विन, माकड, वाघ आणि वेगवेगळे पक्षी दाखवताना दिसत आहेत. आजोबांनी घडवलेली राणीच्या बागेची सफर अथांग खूप एन्जॉय करत आहे. आजोबा आणि नातवाचा हा गोड व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी अरुण कदम यांची मुलगी सुकन्या आणि जावई सागर पोवाळे यांनी हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवलं. दोघांनी मोठं रेस्टॉरंट सुरू केलं. ‘२७ पाम्स रेस्टॉरंट’ असं त्यांच्या रेस्टॉरंटचं नाव असून हे ठाण्यातील कासारवडवली येथे आहे. २०२१मध्ये सुकन्याचं लग्न सागरशी झालं होतं. लग्नाच्या वर्षभरानंतर दोघं आई-बाबा झाले. दोघं सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि नेहमी अथांगचे गोड व्हिडीओ शेअर करत असतात.